Malegaon : इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का? पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळता ते चालतं का? आसिफ शेख यांचा भाजपवर निशाणा
Asif Shaikh On Tipu Sultan : इंग्रजांविरोधात लढताना टिपू सुलतान यांनी बलिदान दिलं, मात्र ते वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून भाजप विरोध करत असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला.

नाशिक : आम्हाला शिवाजी महाराज आदरणीय आहेत, पण त्याचसोबत टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे कार्यही विसरता येणार नाही. इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का? असा प्रश्न मालेगावातील इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी विचारला. टिपू सुलतान फक्त वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना विरोध केला जात आहे. मग भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळला जातोय असा प्रश्नही त्यांनी विचारला. इंग्रजांविरोधात देशासाठी लढताना बलिदान देणाऱ्या टिपू सुलतान यांचा जर फोटो लावला तर त्यामध्ये गैर काय आहे असंही आसिफ शेख यांनी विचारलं.
मालेगावातील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर तो काढण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली. त्यावर आता मोठा वाद निर्माण होत आहे.
भाजपकडून तिरस्काराचं राजकारण
या सर्व प्रकारावर मालेगाव इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी भाजपला काही प्रश्न विचारले. टिपू सुलतान देशद्रोही होते का? त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. इंग्रजांविरुद्ध देशातून पहिला आवाज हा टिपू सुलतान यांनीच उठवला. त्यांच्या कार्याची दखल भारतीय संविधानाने घेतली आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना एवढे वाईट का वाटते आहे? त्यांना तिरस्काराचे राजकारण करायचे आहे, दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत असा आरोप आसिफ शेख यांनी केला.
पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता?
शहरातील शांतता कायम राहावी यासाठी आम्ही तो फोटो मागे घेतला, परंतु भाजप त्यावर एवढा गोंधळ का करतेय असा प्रश्न आसिफ शेख यांनी विचारला. जो पाकिस्तान भारतावर हल्ला करतोय, भारतात दहशतवाद पसरवतोय त्यांच्याशी आपण क्रिकेट का खेळतोय? यांना फक्त कोट्यवधी रुपये कमवायचे आहेत म्हणून हे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतात. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करावं अशी मागणी आसिफ शेख यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श आहेत. पण 2014 नंतर देशात जातीयवादी आणि धार्मिक राजकारण सुरू झालं. त्या माध्यमातून विशिष्ठ एका धर्माला निशाणा केला जात आहे असा आरोप आसिफ शेख यांनी केला. भाजपला भारतीय संविधान बदलायचा आहे, पण ते तसं करू शकत नाहीत असंही आसिफ शेख म्हणाले.
ही बातमी वाचा:
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















