Anil Deshmukh : 'माझ्यावरील कारवाईमागे विदर्भाचा मोठा नेता, वेळ आली की...'; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा
Anil Deshmukh : माझ्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला. माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील मोठा नेता आहे, असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
Anil Deshmukh नाशिक : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज नाशिक दौऱ्यावर होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्कॉर्पिओमध्ये बॉम्ब ठेवणारा मास्टर माईंड कोण होता. याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. तसेच माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील मोठा नेता आहे. वेळ आली की नाव सांगेन, असेही त्यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची आम्ही चौकशी सुरु केली होती. मात्र त्याचवेळी स्कॉर्पिओच्या चालकाची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणाचे मास्टरमाईंड हे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) होते. यात सचिन वाझे आणि चार एपीआय असल्याचे आढळून आले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
...म्हणून परमबीर सिंग यांनी केला 100 कोटींचा आरोप
याबाबतचा रिपोर्ट आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही परमबीर सिंग यांची बदली करून त्यांचे निलंबनही केले होते. त्यानंतर विरोधी पक्षाने परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी दोघांना एकत्र बोलावून आमच्यावर आरोप करण्यास सांगितले होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी 100 कोटींचा आरोप केला होता. हा आरोप झाल्यावर मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
माझ्या कारवाईमागे विदर्भातील मोठा नेता
मागच्या अधिवेशनात हा अहवाल पटलावर मांडावा, अशी मागणी होती पण तसे झाले नाही. हा अहवाल येऊ नये अशी सत्ताधारी नेत्यांची इच्छा आहे, यामागे विदर्भातील मोठा नेता आहे, वेळ आल्यावर नाव सांगेल. माझ्यावर आरोप झाले याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मी निवडणूक प्रचारात पेनड्राईव्हच लोकांना दाखवणार आहे. माझ्यावर 100 कोटींचा आरोप झाला. पण 1 कोटी 71 लाखावर चार्जशीट दाखल केले, पण त्याचेही पुरावे कोर्टासमोर दाखवू शकले नाहीत. चांदीवाल अहवाल जाहीर करा. नाही तर वेळ आली तर कोर्टात जाईल, असा इशारा अनिल देशमुख यांनी यावेळी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या