(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain : घरच्यांना वाटलं, भजनाला गेले, मात्र.... सुरगाणा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Nashik Rain : सुरगाणा तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू (Lighting Strike) झाल्याची घटना घडली आहे.
Maharashtra Nashik Rain: गेल्या आठवडाभरापासून नाशिकला (Nashik News) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपीट देखील झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी झालेल्या पावसात सुरगाणा तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू (Lighting Strike) झाल्याची घटना घडली आहे.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. अशातच या पावसामुळे काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. दरम्यान नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात देखील वीज पडून दोन शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर सुरगाणा (suragana) तालुक्यातील सराड गावी रविवारी 19 मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम निंबा भोये या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सावळीराम भोये हे आपल्या शेतात घरातील कोणालाही न सांगताच सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी घरच्यांनी शेतात आणि परिसरात शोधाशोध केली असता ते आढळून आले नाहीत. त्यांना भजनाचा छंद असल्याने ते भजनात गेले असावेत, सकाळी घरी परत येतील असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी 20 मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेतात शोध घेतला असता शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्डयात गवत झुडपात त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान सुरगाणा पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन भोये यांचे ते वडील होते. परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. एकीकडे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कालपर्यंत पावसाची चिन्हे होती. मात्र आज देखील शहरसह जिल्ह्यात ढगाळ हवामान असून सायंकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसून लागली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेती पिकांना फटका
सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे.