(Source: Poll of Polls)
Nashik News : राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर, यंत्रणेची धावपळ, दौऱ्यावर आदिवासी आंदोलनाचे सावट, असा असेल दौरा
Nashik News : राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे गुरुवारी नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर असून, ते दोन्ही विद्यापीठांना भेट देणार आहेत.
नाशिक : राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे गुरुवारी नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर असून, ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाला भेट देणार आहेत. याशिवाय केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा आढावादेखील ते घेणार असल्याने शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाकडे (YCMOU) जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत होता, मात्र राज्यपाल बैस मुक्तविद्यापीठाचा दौरा करणार असल्याने या रस्त्याला देखील झळाळी मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais Nashik) हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी शासकीय यंत्रणांकडून चांगलीच तयारी करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठक तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यपाल दौऱ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना राजशिष्टाचार पालन करण्याच्या सूचना केल्या. तसेच आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेळेत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारीदेखील अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यपाल रमेश बैस हे मुक्त विद्यापीठासह आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) व शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांमधील केंद्राच्या योजनांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे शासकीय विश्रागृहावर देखील सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान राज्यपाल रमेश बैस हे पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर येत असून ते मुक्त विद्यापीठाचे कुलपती असल्याने मुक्त विद्यापीठाचा दौरा करणार आहेत. या ठिकाणी दुपारी 2 ते 3 या वेळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, पायाभूत सुविधा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि निकाल वेळत लागण्यासंदर्भातील विषयावर चर्चा करणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आरोग्य विज्ञान विद्यापीठालादेखील राज्यपाल भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या उपस्थितीत विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यात पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हर घर जल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री किसान योजना, कृषी योजना, शाळा इमारत, डीबीटी प्रदान लाभ योजना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आश्रम शाळा, अंगणवाडी यांचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
आदिवासी आंदोलनामुळे यंत्रणेची धावपळ
एकीकडे राज्यपाल रमेश बैस हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत असून प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे पोलीस यंत्रणेकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र एकीकडे राज्यपालांचा दौरा असताना आदिवासी बांधवांचे आंदोलन देखील आहे. धनगर समाजाला आदिवासी बांधवांच्या आरक्षणातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा सुरु असताना सर्व शासकीय यंत्रणा त्यांच्याकडे असतील, मात्र दुसरीकडे आदिवासी आंदोलन देखील असल्याने यंत्रणेची चांगलीच धावपळ होणार आहे.