Nashik Vegetables Rate : पाऊस लांबला! नाशिकमध्ये भाजीपाला कडाडला, कोथिंबीर शंभर रुपयाला जुडी, असे आहेत दर?
Nashik Vegetables Rate : नाशिकमध्ये कोथिंबीरीसोबतच मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांचे दर जवळपास 50 टक्यांनी वाढले आहेत.
Nashik Vegetables Rate : पावसाचे अद्याप (Rain) आगमन झाले नसल्याने नाशिकमध्ये एकीकडे धरणांनी (Dam Storage) तळ गाठला आहे. तर दुसरीकडे पालेभाज्यांच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. गेल्या महिन्यात कोथिंबीर जुडी 4 ते 5 रुपये दराने विकली जात होती, त्याच कोथिंबीरीला आज 100 ते 110 रुपयांचा भाव आला आहे तर कोथिंबीरीसोबतच मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांचे देखील दर जवळपास 50 टक्यांनी वाढले आहेत.
रोजच्या जगण्यासाठी लागणारा भाजीपाला (Vegetables) दरात मागील काही दिवसांत कमालीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र आता भाज्याचे दर कडाडले असून सर्वच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामन्यांच्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे. मागील आठवड्यात कोथिंबीर जुडी 47 ते 50, तर शेपू, मेथी 35 रुपयाला जुडीचा दर होता, मात्र यात वाढ होऊन आज 100 ते 110 रुपयांचा भाव आला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नाशिकसह मुंबईच्या (Mumbai) अनेक बाजारात नाशिकला भाजीपाला पोहचवला जातो. मात्र यंदा भाजीपाला दर तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षात अनेकदा भाजीपाल्याच्या दरात तफावत आढळून आली. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच आता कुठे भाजीपाला दरात वाढ होत असल्याने शेतकरी संधान व्यक्त करत आहेत. आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहिल्याने पालेभाज्यांसह अन्य कृषीमालाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न समितीत मुख्यत्वे पालेभाज्या आणि कोथिंबिरसोबत अन्य काही भाजीपाल्याची आवक घटून दर कमालीचे उंचावले आहेत.
आवक घटली, दर वाढले..
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात असून इथूनच राज्यातील अनेक जिल्ह्यात भाजीपाला पुरवठा केला जातो. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून 150 ते 200 वाहनांमधून भाजीपाला मुंबई व उपनगरांमध्ये पाठविला जातो. या वर्षी एल निनोच्या प्रभावाने पावसाला विलंब होणार असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर बिपरजॉयमुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाले नसल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे शेतीला देखील पाणी उपलब्ध होत नसल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. दरम्यान नाशिकच्या घाऊक बाजारात कोथिंबिरला प्रती 100 जुड्या सरासरी 4700 रुपये, मेथी 3300, शेपू आणि कांदा पात प्रत्येकी 3500 रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात हेच दर जवळपास दीड ते दोनपट होत असल्याने गृहिणींचे आर्थिक गणित विस्कटले आहे.
असा आहे आजचा दर
दरम्यान पाऊस येण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार असल्याचा अंदाज आहे. मात्र पावसाअभावी भाजीपाल्याची आवक घटली आहे. सध्या प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्यांबरोबर अन्य भाजीपाल्याची आवक घटल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजार समितीच्या दैनंदिन आवकवर नजर टाकल्यास स्थिती लक्षात येते. बाजार समितीत एका दिवसात कोथिंबिर 7 हजार जुड्या, मेथी 6 हजार जुड्या, शेपू 6800 जुड्या, कांदापात 6 हजार जुड्या अशी आवक होत आहे. यात कमी अधिक फरक दररोज होतो. मागील आठवड्यात घाऊक बाजारात कोथिंबिरला प्रतिजुडी 47, मेथी 33, शेपू 35 आणि कांदा पात 35 रुपये जुडी होती. आज कोथिंबिरीला 100 ते 110 रुपयांचा भाव आला आहे. दरम्यान पाऊस लांबल्याने आवक जवळपास 60 ते 70 टक्के कमी झाली असून जवळपास एक महिना ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.