Nashik Water Storage : नदीही आटली, धरणाचं पाणी आटत चाललंय! गंगापूर धरणात अवघा 32 टक्के पाणीसाठा
Nashik Water Storage : गंगापूर धरणात (Gangapur Dam) सद्यस्थितीत 32 टक्के पाणीसाठा असून पाणी जपून वापरण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.
Nashik Water Storage : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा कमी चालला असून जिल्ह्यातील धरणांत केवळ 23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) सद्यस्थितीत 32 टक्के पाणीसाठा असून पाणी जपून वापरण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. त्यामुळे पुढील काळात पाऊस लांबणीवर गेल्यास पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिपरजॉय (Biparjoy) वादळामुळे मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे यंदा मान्सूनच्या सरी कोसळायला विलंब लागणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे जिल्हाभरात पाण्याचा (Nashik District) आटणकाळ सुरु असून अनेक भागात तीव्र पाणीटंचाई (Water Crisis) सुरु आहे. नदी, विहिरी आता धरणेही कोरडीठाक होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाऊस ओढ देण्याची शक्यता पाहता, जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. तर नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात पाणीसाठा 32 टक्केच असून, पावसाने जास्तीच ओढ दिली तर मात्र नाशिककरांवर पाणी कपातीचीही वेळ येऊ शकते.
नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केलेला आहे. त्यानुसार, पाऊस नेहमीपेक्षा आणखी काही दिवस लांबण्याची चिन्हे आहेत. पाऊस अधिकच लांबला तर मात्र नाशिककरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गंगापूर धरणामध्ये आजमितीस अवघा 32 टक्के पाणीसाठा आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा देखील वाढला असल्याने पाण्याचे मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होत आहे.
गंगापूर धरणात 32 टक्के पाणीसाठा
दरम्यान गंगापूर धरणात 32 टक्के पाणीसाठा असून समूहात 22 टक्केच साठा उपलब्ध असल्याने नाशिककरांना देखील पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे. तसेच, उन्हाळा असल्याने नाशिककरांकडून पाण्याचा वापरही वाढला आहे. परिणामी, गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 32 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. याच दिवशी गेल्या वर्षी गंगापूर धरणातील पाणीसाठा 29 टक्के होता. तेव्हाही पाऊस लांबण्याच्या शक्यतेने पाणीटंचाईचे संकट ओढावले होते. परंतु ऐनवेळी पावसाचे जोरदार हजेरी दिली आणि पाणी कपातीचे संकट टळले होते. यंदा मात्र मान्सूनच उशिराने दाखल होत असल्याने नाशिककरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार कायम आहे. जिल्ह्यातील माणिकपूंज, नाग्यासाक्या या दोन धरणातील पाणीसाठा शून्य टक्के आहे.
नाशिकवर पाणी कपातीचं संकट
मान्सूनचं अद्याप आगमन झालेलं नसल्याने धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून आजमितीस नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 15 धरणांमध्ये 20 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे तर जिल्ह्याचा धरणसाठा हा 23 टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरण समूहात 22 टक्के, पालखेड धरण समूहात 13 टक्के तर गिरणा धरण समूहात 24 टक्के पाणी शिल्लक आहे. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता चिंता व्यक्त केली जात असून गंगापूर धरणात ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातं असून पावसाने लवकर हजेरी न लावल्यास नाशिकवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची भिती आता व्यक्त केली जाते आहे.
असा आहे जिल्ह्यातील पाणीसाठा
गंगापूर धरणात 32, कश्यपी 14, गौतमी-गोदावरी 9, आळंदी 1 असा एकूण गंगापूर धरण समूहात 22 टक्के जलसाठा आहे. तर जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील साठा पाहिला तर पालखेड 36, करंजवण 13, ओझरखेड 25, दारणा 20, भावली 8, मुकणे 38, वालदेवी 19, चणकापूर 28, गिरणा 23 असा पाणीसाठा उपलब्ध आहे.