Nashik Women Cancer : महिलांनो कॅन्सरची समस्या जाणवतेय? दुर्लक्ष करु नका, इगतपुरीत मोफत तपासणी शिबीर
Nashik Women Cancer : नाशिकच्या इगतपुरी येथे महिलांसाठी भव्य कॅन्सर आरोग्य शिबीर राबविण्यात येत आहे.
Nashik Women Cancer : कुठलाही आजार म्हटलं कि मनात धडकी भरते. त्यातच कॅन्सर म्हटलं रुग्णांसह नातेवाईकांना अनेकदा सुचत नाही. हल्ली महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी (Igatpuri) येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून भव्य आरोग्य शिबीर महिलांसाठी राबवण्यात येत आहे.
महिलांमधील कर्करोगाची समस्या (Cancer) दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. यामुळे गर्भाशय, स्तनांशी निगडीत महिलांना त्रास जाणवत असेल तर त्यांनी तात्काळ या शिबिरात सहभागी होऊन आपली तपासणी करुन घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे. एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमार्फत महिलांसाठी भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर एसएमबीटी हॉस्पिटल नंदी हिल्स इगतपुरी तालुक्यातील धामणगाव आणि नाशिक शहरातील मुंबई नाका येथील एसएमबीटी क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. येत्या 23 जानेवारीपासून या शिबिराला सुरुवात होणार असून 28 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी प्रतिबंधात्मक तपासणी करुन घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.
शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आलेल्या महिलांची तपासणी करणार
भारतात दर एक लाख लोकवस्तीत 100 कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण सांगण्यात येते. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता अधिकच वाढते. महिलांमध्ये गर्भाशयाचे आणि स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कर्करोगाचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर तो बरा होऊ शकतो. सध्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या आजारातून अनेक रुग्ण बरे होऊ लागले आहेत. कर्करोग त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. दरम्यान या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आलेल्या महिलांची तपासणी करणार आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत पॅप स्मीयर (Pap smear) टेस्ट आणि स्तनांची सोनोग्राफी म्हणजेच मॅमोग्राफी केली जाणार आहे.
दरम्यान हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरु शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, घसा आणि गर्भाशयाचे तोंड या भागाशी संबंधित असतात असे तज्ञ सांगतात. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचा टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरसोबत गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक करार झाला आहे. यामुळे मोठ्या संख्येने तज्ञ डॉक्टर याठिकाणी उपलब्ध झाले असून अनेक जटील शस्त्रक्रिया एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या आहेत. अद्ययावत आणि अत्याधुनिक साधनसामुग्री याठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे खर्चिक समजल्या जाणाऱ्या अनेक शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चात होत आहेत.
ही आहेत कर्करोगाची लक्षणे
अचानक रक्तपांढरी होणे. भूक मरणे. शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे. उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर रक्तस्राव होणे, स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, खोकल्यातून रक्त पडणे, अन्न गिळताना अडकल्यासारखे वाटणे, पोट जड वाटणे, न पचलेले अन्न उलटणे, तोंडात न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे, लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव, बध्दकोष्ठतेची तक्रार, काखेत, जांघेत, गळयात, कडक गाठींचे अवधाण येणे
वरील लक्षणे असलेल्या रुग्णांनी अधिक माहितीसाठी 91450 01630 क्रमांकावर संपर्क साधावा किंवा एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव आणि नाशिकमधील एसएमबीटी क्लिनिकला अवश्य भेट देऊन तपासणी करुन घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.