Pahine Waterfall : वन कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यातच धो धो धुतलं, पहिने धबधब्यावरील व्हिडीओ व्हायरल
Nashik Pahine Waterfall : नाशिकच्या पहिने धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे.
Nashik News : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर परिसराला निसर्गाचे कोंदण लाभलं असून सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्र्यंबकेश्वरसह पहिने, अंजनेरी गडावर भाविकांसह पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. मात्र दुसरीकडे पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करून धुडगूस घातला जात आहे. पहिने (Pahine) येथे याच हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नाशिकपासून (Nashik) अवघ्या काही अंतरावर असलेल्या पहिने, अंजनेरीसह त्र्यंबकेश्वर (trimbakeshwer) परिसर हिरवाईने नटला असून पर्यटकांची पावले नाशिकचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकच्या दिशेने वळू लागली आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. येथील अंजनेरी, पहिनेसह ब्रम्हगिरीच्या (Bramhgiri) डोंगर कड्यांनी हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे. चहुबाजूंनी वेढलेल्या सह्याद्री पर्वत रांगेने हिरवाईचा साज चढवला आहे. फेसाळणारे धबधबे, चिखलाच्या अनवाणी वाटा, फुलांनी बहरलेले डोंगर यामुळे पर्यटकांचे गर्दी होऊ लागली आहे. यात तरुणाईचा अधिक सहभाग असून निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी निसर्ग पायदळी तुडविण्याचे काम पर्यटकांकडून सुरु असल्याचे चित्र आहे.
पहिने येथील नेकलेस धबधबा (Pahine waterfall) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. पेगलवाडी पासून ते पहिने पर्यत वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येतात. त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडी होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग पाहायला मिळते. काल रविवार असल्याने पर्यटकांची पहिनेला झुंबड उडाली होती. अशातच नेकलेस धबधब्यावर धिंगाणा घालत हुल्लडबाजी सुरू होती. यावेळी काही टवाळखोर मद्यसेवनही करत होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यावरून वन कर्मचाऱ्यांनी संबंधित पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यातच धो धो धुतले. पर्यटनस्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना वनविभागाच्या सुरक्षारक्षकांनी चोप दिला. त्र्यंबकेश्वर - घोटी मार्गावरील पहिणे गावातील काल दुपारी चार वाजेची घटना असल्याचे समजते.
नेकलेस धबधबा पाहण्यासाठी गर्दी
नाशिकजवळ असलेल्या पहिने या निसर्ग पर्यटनस्थळांवर (Necklace Waterfall) गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची चांगलीच गर्दी होते आहे. पावसाळ्यात हा परिसराला देखणे स्वरूप प्राप्त होते. या ठिकाणी असलेल्या नेकलेस धबधबा पाहण्यासाठी शनिवारी रविवारी वीकेण्डला मोठी गर्दी होते. कॉलेजच्या महाविद्यालयीन तरुण तरुणींसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. मात्र अशावेळी तरुणाईकडून धांगडधिंगा केला जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. शनिवार रविवारच्या विकेंडला मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा ग्रुप हा पहिनेला येत असतो. मात्र मद्यपान, नाचगाणी असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच वनविभागाकडून कर्मचारी तैनात करण्यात आले असून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना समज दिली जात आहे.
इतर संबंधित बातम्या :
पर्यटनस्थळावरील हाणामारीचा 'तो' VIRAL VIDEO नाशिकच्या पहिनेचा, अंगावर पाणी उडवल्याच्या कारणावरुन वाद
नाशिकच्या पहिने नेकलेस धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. #नाशिक #Nashik #Pahine #पहिनेधबधबा #त्र्यंबकेश्वर pic.twitter.com/LWKTrWHiva
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) July 31, 2023