Nashik onion News : पिंपळगावसह चांदवड बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद, कमी दरामुळं शेतकरी संतप्त
Nashik onion News : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.
Nashik onion News : नाशिकच्या (Nashik) पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pimpalgaon Agricultural Produce Market Committee) शेतकरी संतप्त झाले आहेत. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. चांगल्या दर्जाच्या कांद्याला 1 हजार 500 ते 2000 रुपयांचा दर दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.
नाफेडने बाजार समितीत येऊन कांदा खरेदी करावा
चांगल्या प्रतिच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळं शेतकरी संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यासोबतच नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र, नाफेड कुठे आहे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. नाफेडने बाजार समितीत येऊन कांद्याला 2 हजार 400 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लिलाव सुरु होताच कांद्याला 1 हजार 800 ते 2000 रुपयांचा भाव पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
नांदगाव आणि मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरु
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची लिलाव प्रक्रिया सुरुळीत सुरु आहे. या दोन्ही बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 1 हजार 800 ते 2 हजार 200 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. दरम्यान, बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीने जिल्ह्यातील काही बाजार समितीचे लिलाव पूर्ववत सुरु झाले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य 40 टक्के केल्यानं तीन दिवसांपासून बाजार समित्या बंद होत्या.
कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क (Onion Export Duty) आकारल्याच्या मुद्यावरुन वातावरण चांगलचं तापलं आहे. शेतकऱ्यांसह व्यापारी संतप्त झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, काल (23 ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापाऱ्यांसह शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळं आजपासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु करण्यात आले आहेत. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेच. मात्र, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याचे लिलाव संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: