Onion : तीन दिवसानंतर नाशिकमध्ये पुन्हा कांद्याचे लिलाव सुरु, मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय
Nashik APMCs : आजपासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु करण्यात आले आहेत.
Nashik APMCs : कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क (Onion Export Duty) आकारल्याच्या मुद्यावरुन वातावरण चांगलचं तापलं आहे. शेतकऱ्यांसह व्यापारी संतप्त झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, काल (23 ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापाऱ्यांसह शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन मंत्री भारती पवार यांनी दिले आहे. त्यामुळं आजपासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाले आहेत.
लालसगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरु
आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लालसगाव बाजार समितीमध्ये तीन दिवसानंतर आज सकाळी नऊ वाजता लिलावला सुरुवात झाली. कांद्याला क्विंटलमागे 2000 - 2500 रुपये भाव दिला जात आहे. केंद्राच्या निर्णयाचे परिणाम लवकरच जाणवतील. बाजार समितीत कांद्याची आवक वाढेल आणि भाव कोसळतील असं व्यापाऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. .
विविध शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा
कांद्यावरील निर्यात शुल्क विरोधात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी, विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली वारी करत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्र सरकारनं महाराष्ट्रात दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्यास सुरुवात देखील करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर काल मंत्री भारती पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर बाजार समित्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कांदा निर्यात शुल्काबाबत सरकारला सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करणार
कांद्याच्या निर्यातीवर जे 40 टक्के निर्यात शुल्क आकारले आहे, त्याबाबत आम्ही केंद्र सरकारला पुनर्विचार करुन सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती मंत्री भारती पवार यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. मात्र, केंद्राच्या निर्णयानंतर लासलगाव नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते.
बाजार समित्या बंद ठेवल्यामुळं शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही प्रचंड नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली, पण त्यातून तोडगा कोणताच निघाला नाही. त्यामुळं काल केंद्रीय राज्यमंत्री आणि दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत अखेर कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय झाला असून कांदा खरेदी बंदीची कोंडी फुटली आहे. त्यामुळं आजपासून पुन्हा कांदा लिलावाला सुरुवात होणार असून आता शेतकरी यावर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: