Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Nashik Lok Sabha Constituency : महायुतीत नाशिकची जागा प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. आता छगन भुजबळांच्या माघारीनंतर थेट प्रीतम मुंडे यांचे नाव नाशिकच्या जागेसाठी चर्चेत आले आहे.
Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकरून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांचे प्रचाराची एक फेरीदेखील पूर्ण झाली आहे. महायुतीत (Mahayuti) मात्र नाशिकच्या जागेवरून अजूनही जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. दररोज नवनवीन इच्छुकांची नावे समोर येत असून आता थेट प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचे नाव चर्चेत आले आहे.
काल बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 'मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रितम मुंडेंचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून (Nashik) उभी करेन, असे वक्तव्य त्यांनी केले.
महायुतीकडून नव्या ओबीसी नेताच शोध?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असताना पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून (BJP) नाशिकसाठी थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून जाहीर माघार घेतली. भुजबळांच्या घोषणेनंतर महायुतीकडून नव्या ओबीसी चेहऱ्याचा शोध सुरु असल्याचे समजते. आता भाजपकडून प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक जागा बनली महायुतीत प्रतिष्ठेचा विषय
दरम्यान, नाशिकच्या जागेवरून महायुतीत अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटी घेऊनही नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची घोषणा अजूनही झालेली नाही. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी हेमंत गोडसेंच्या नावाला काही अडचण असल्यास मी देखील इच्छुक आहे, असा पुनरुच्चार केला आहे. नाशिकची जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांसाठी आता प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. आता नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या