ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
ABP C Voter Opinion Poll : एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात महायुतीला एकूण 30 जागा तर मविआला 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ABP C Voter Opinion Poll : देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल (ABP C Voter Opinion Poll) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर महायुतीचे (Mahayuti) उमेदवार विजयी होतील. तर 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांचा विजय होईल. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण आठ जागा असून त्यात भाजपचा दबदबा राहणार असल्याचे दिसून येत आहे. यात भाजपला पाच जागा, ठाकरे गटाला एक जागा तर शरद पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये महायुतीचाच बोलबाला
नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीत मात्र अजूनही या जागेवरून तिढा कायम आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोलनुसार या जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
धुळे, नंदुरबारमधून कोण?
तर धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांच्यात तिरंगी लढत होणार असून यात डॉ. सुभाष भामरे यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात (Nandurbar Lok Sabha Constituency) डॉ. हिना गावित आणि गोवाल पाडवी यांच्यात लढत होणार आहे. एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार डॉ. हिना गावित यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगावमधून स्मिता वाघ बाजी मारण्याची शक्यता
जळगाव लोकसभा मतदारसंघावरून (Raver Lok Sabha Constituency) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांच्या लढतीत स्मिता वाघ बाजी मारणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रावेर, दिंडोरीतून कोण होणार विजयी?
रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाकडून संतोष चौधरी हे इच्छुक होते. मात्र शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात रक्षा खडसे यांचे पारडे जड असून त्या विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून (Dindori Lok Sabha Constituency) भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना तिकीट दिले असून यंदाही भारती पवारच बाजी मारणार असा एबीपी माझाच्या ओपिनियन पोलचा अंदाज आहे.
शिर्डीत ठाकरे गट आघाडीवर
शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) शिंदे गटातून सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ठाकरे गटाने भाऊसाहेब चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब चौधरी यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र यात ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी बाजी मारणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये सुजय विखे की निलेश लंके?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी मोठी खेळी खेळत निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. सुजय विखे विरुध्द निलेश लंके यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यात निलेश लंके हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. डॉ. सुजय विखे पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)
आणखी वाचा