चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप
Nashik News : इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेत चक्कर आल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी पालकांनी शाळेवर असलेल्या मोबाईल टॉवरबाबत तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षण विभागाने दखल घेतली आहे.
नाशिक : इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थिनीचा (Student) शाळेत चक्कर आल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी पालकांनी शाळेवर असलेल्या मोबाईल टॉवरबाबत (Mobile Tower) तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेच्या (Nashik NMC) शिक्षण विभागाने (Education Department) याबाबत दखल घेतली आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंटवाडी (Untwadi) परिसरातील जगतापनगर (Jagtapnagar) येथील दिव्या त्रिपाठी ही मंगळवारी सकाळी शाळेत गेली होती. दिव्याला बरं वाटत नसल्यामुळे ती आसनस्थळी डोकं ठेवून बसली होती. तिला चक्कर आल्यामुळे ती बेशुध्द पडली आणि खाली कोसळली. शाळेकडून दिव्याच्या तब्येतीविषयी पालकांना तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर वडील प्रतेश त्रिपाठी आणि शिक्षिका चैताली चंद्रात्रे यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले होते.
मोबाईल टॉवर काढण्याची मागणी
यानंतर शाळेच्या इमारतीवर तीन मोबाइल टॉवर असल्यामुळे या टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या लहरींमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला होता. दिव्याच्या मृत्यूनंतर इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा गाठत इमारतींवरील मोबाइल टॉवरमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचा आरोप करीत, मोबाईल टॉवर काढण्याची मागणी केली.
मोबाईल टॉवरची चौकशी होणार
याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. पालकांच्या तक्रारीनुसार शाळेवरील मोबाईल टॉवरची चौकशी केली जाणार आहे. टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या लहरींचा दुष्परिणाम होत असेल तर त्याचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
शाळकरी मुलाचं अपहरण करुन मागितली 5 कोटींची खंडणी, पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना केलं जेरबंद