EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सील फुटल्याची अफवा, तर जुन्या सीलवरच नवीन सील केल्याचा पोलिसांचा दावा, शहाद्यात संशयकल्लोळ
Shahada Nagar Palika Election : शहादा नगरपालिकेच्या स्ट्राँग रुमचे जुने सील उघडून त्या ठिकाणी नवीन सील लावण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला. तर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

नंदुरबार : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं, त्यामुळे ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनावर आहे. मात्र नंदुरबारमधील शहाद्यात(Shahada Nagar Palika) ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे त्या स्ट्राँग रुमचे सील आधीच फुटल्याचा दावा उमेदवारांनी केला. तर असं काही झालं नाही, आधी जुने सील होते, मतदानानंतर त्यावर नवीन सील लावण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र, स्ट्राँग रुमचे सील फुटल्याच्या आरोपानंतर शहाद्यात सर्व उमेदवार आणि लोक मात्र जमल्याचं दिसून आलं.
शहादा नगरपालिकेच्या स्ट्राँग रुमचे सील खोलून त्या ठिकाणी नव्याने सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवाराने व्यक्त केला. त्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या टाऊन हॉल परिसरात ठेवण्यात आल्या आहे. या ठिकाणी प्रभाग 8 च्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सीमा साजिद अन्सारी या जेव्हा सील पाहणीसाठी आल्या तेव्हा त्यांना जुन्या सीलवर नवीन सील आढळून आले.
Shahada Nagar Palika Election : प्रशासनाकडून स्पष्टीकरण नाही
यावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने हरकत घेत आधीचे सील का फुटले आणि नव्याने सील कधी लावले याबाबत स्पष्टीकरण मागितले. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकार हे दोघेही बाहेरगावी असल्याने याबाबत कुणालाही स्पष्टीकरण देता आले नाही.
स्ट्रॉग रुमचे सील फुटल्याची अफवा शहरात पसरातच अनेक उमेदवारांनी टाऊन हॉल परिसरात गर्दी केली. यावेळी पोलीसांनी कुठल्याही ईव्हीएमचे सील फुटलं नसल्याचं सांगितले. मतदानाच्या आधी टाऊन हॉलमध्ये मतदान यंत्रं ठेवण्यात आली होती, त्यावेळी हे सील लावण्यात आले होते. मतदानच्या दिवशी हे सील काढूनच मतदान यंत्रांचे वाटप झालं होतं. मतदानानंतर ईव्हीएम मशिन बंद झाल्यानंतर त्यावर सील मारण्यात आल्यानं हा संशयकल्लोळ निर्माण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणं आहे. मात्र याबाबत अधिकृतरित्या बोलायला कुणीही उपलब्ध नाही.
Shahada EVM Strong Room News : जुन्या सीलवर नवीन सील का मारले?
या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यास प्रशासन तयार आहे. मात्र आधीचे तोडण्यात आलेले सील पूर्ण न काढताच त्यावर नव्याने सील मारण्याची घाई प्रशासनाने का केली हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. दरम्यान, स्ट्राँग रुमचे सील तुटले असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचं प्रशासकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा :
























