Nandurbar News : साखर शाळा सुरु न झाल्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान, मजुरांना मुलांच्या भविष्याची चिंता
Nandurbar News : ऊस तोडणी मजूर आपल्या मुलाबाळांसह ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा अजून सुरु झाल्या नसल्याने कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे.
Nandurbar News : राज्यभरात ऊस (Sugarcane) तोडणीचा हंगाम सुरु झाला असून मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर आपल्या मुलाबाळांसह ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा अजून सुरु झाल्या नसल्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
अनेक जिल्ह्यात साखर शाळा सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान
राज्यांतील अनेक जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी मजूर स्थलांतर करत असतात. त्यांच्यासोबत मुलाबाळासह कुटुंब कबिला असतो. गावाकडे कोणी नसल्याने ऊस तोडणीच्या ठिकाणी मुला बाळांना घेऊन ते राहत असतात. गावाकडून आल्यानंतर जिल्हा परिषद आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून साखर शाळा सुरु केल्या जात असतात. मात्र अजूनही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात साखर शाळा सुरु झाल्या नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही मोलमजुरी करुन जीवन जगत असलो तरी सरकारने आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी कैफियत ऊसतोड कामगार मांडताना दिसत आहेत.
आमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? पालकांचा उद्विग्न सवाल
आम्ही आयुष्यभर काबाडकष्ट केले. गावाकडे मुलांना सांभाळण्यासाठी कुणी नसल्याने मुलांना सोबत घेऊन यावे लागते. आम्ही ज्या कारखाना परिसरात राहतो त्या ठिकाणी आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची गरज आहे. एकीकडे सरकार शिकाल तर टिकाल अशा घोषणा करत असते मात्र आमच्या मुलांच्या शिक्षणाचे काय असा प्रश्न होताच पालक विचारताना आपल्याला दिसतात.
अधिकाऱ्यांचा कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार
या प्रश्नावर आम्ही जिल्हा प्रशासनाचा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र थातूरमातूर उत्तर देत कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. शिक्षण हक्काचा कायदा फक्त कागदावर राहिल की या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक आयुष्य उजळण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, हे साखर शाळा सुरु झाल्यावरच कळेल.
VIDEO : Nandurbar : ऊस तोडणी मजुरांच्या मुलांचं शाळेचं शैक्षणिक नुकसान, साखर शाळा अद्याप बंदच
भारतात बहुतांश ऊसतोड कामगारांद्वारे
भारतामध्ये अनेक ठिकाणी यंत्राद्वारे ऊसतोडणी केली जाते, परंतु जास्त ऊसतोड कामगारांद्वारेच होते. कोयत्याने ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे, त्या उचलून आणि वाहून मोठ्या वाहनात भरणे आणि वाहतूक करणे इत्यादी कामं ऊसतोड कामगारच करतात. महाराष्ट्रात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. ऊस तोडणीत महिलांचा सहभाग हा पुरुषाच्या बरोबरीने असतो.