Nandurbar News : बोट अॅम्ब्युलन्सचा 17 वर्षांचा प्रवास, नंदुरबारमधील हजारो रुग्णांना जीवदान, आज बोट अॅम्ब्युलन्स मोजतेय अंतिम घटका
Nandurbar Boat Ambulance : गेल्या सतरा वर्षांपासून बोट अॅम्ब्युलन्स आरोग्य सुविधा पोहचवत असून शेवटच्या घटक मोजत असल्याचे चित्र समोर आलं आहे.
नंदुरबार : एकीकडे राज्यातील आरोग्य प्रशासनाच्या (Health Department) भोंगळ कारभारामुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे, राज्यातील अनेक भागात आजही आरोग्य सुविधा पोहचू शकल्या नसल्याचे वास्तव आहे. मात्र दुसरीकडे नंदुरबार सारख्या आदिवासी भागात जिथे वाहने पोहचू शकत नाहीत, अशा ठिकाणी गेल्या 17 वर्षांपासून बोट ऍम्ब्युलन्स आरोग्य सुविधा पोहचवत आहेत. मात्र आता या बोट ऍम्ब्युलन्स (Boat Ambulance) आता शेवटच्या घटक मोजत असल्याचे चित्र समोर आलं आहे.
आज आरोग्य सुविधा पाहिली तर सर्व सामान्य नागरिक सरकारी रुग्णालयांची (Civil Hospital) पायरी चढण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यातच नांदेड आणि संभाजीनगर (Sambhajinagar) येथील सरकारी रुग्णालयातील अनास्था या घटनांमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. दुसरीकडे आजही काही आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा पुरवत असल्याचे उदाहरण नंदुरबारमधून (Nandurbar) समोर आले आहे. सरदार सरोवरच्या निर्मितीनंतर नर्मदा काठावरील दुर्गम भागातील गावांना आरोग्य सुविधा देण्यासाठी अनेक समस्या होत्या. सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे आरोग्य सुविधा देण्यासाठी तरंगत्या दवाखान्यांची गरज ओळखून युरोपियन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने दिले होते. मात्र गेल्या सतरा वर्षात घसारा झाल्याने तरंगता दवाखाना धोकेदायक झाला आहे. मात्र याही परिस्थितीत सुविधा पुरवल्या जात असल्याचे वास्तव आहे.
नर्मदा काठावर (Narmda River) अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या अनुशंगाने 2005 मध्ये युरोपीयन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने जिल्हातील आरोग्य यंत्रणेला भेट दिले. मात्र आजपर्यत सतरा वर्षांपासून जवळपास आरोग्य सुविधा पुरवत असल्याने हे तरंगते दवाखाने आता अंतिम घटका मोजत असल्याचे चित्र आहे. गेल्या सतरा वर्षात व्यवस्थित देखभाल दुरुस्ती न झाल्याने तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील अतिशय बिकट झाली आहे. यातील एक दवाखाना तर 2015 मध्येच बुडाला असुन त्याला बाहेर काढण्याची तसदी देखील प्रशासनाने घेतली नाही. तर दुसरीकडे चिमलखेडी येथे तैणात असलेल्या तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील बिकट झाली आहे. यातील विद्युत व्यवस्था बंद पडल्याने वैद्यकीय पथकाला रात्री अपरात्री रुग्ण आल्यास टॉर्चच्या उजेडात रुग्णांना तपासावे लागत आहे. अशाही जीवघेण्या आणि धोकेदायक तरंगत्या दवाखान्यातून तटपुंज्या सुविधा आणि अंधारात आरोग्य व्यवस्था आपल्या काम चोख बजवित असून नर्मदा काठावरील हजारो नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहेत.
आरोग्यसेवा अधिक बळकटीची गरज
दरम्यान याच परिसरातील चिमलखेडी येथील तरंगता दवाखाना जवळपास परिसरातल्या 09 खेडे आणि पन्नासहुन अधिक पाड्यांसाठी कार्यरत आहे. यावरील पथकाने सोमवारपासुन ते शनिवारपर्यत मुक्कामाचे एक वेळापत्रक तयार केले असुन त्यानरुप प्रत्येक गावाच्या काठावर हा तरंगता दवाखाना पोहचुन आरोग्य सेवा पुरवत आहे. मुळातच यातील अनेक गावांना येण्यासाठी रस्ताच नसल्याने हा दवाखानाच आपल्या आरोग्यासाठी सर्व काही असल्याचे नागरीक सांगत आहेत. मागील वर्षी माझगाव डॉकच्या अधिकाऱ्यांनी या तरंगत्या दवाखान्याची तपासणी करुन त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही सादर केला. मात्र दुरुस्तीच्या खर्चात नविन अत्याधुनक अशा बोट ऍम्ब्युलन्स येवु शकत असल्याने या युरोपीयन कमिशनने दिलेल्या दवाखान्याच्या दुरुस्तीचा विचारही आरोग्य विभागाने सोडुन दिल्याचे चित्र आहे. अशातच या धोकादायक झालेल्या तरंगत्या दवाखान्याचा वापर करुन आरोग्य यंत्रणा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणार का असाच काहीसा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय शासन स्तरावरुच याबाबत ठोस निर्णय घेवुन नवीन बोट ऍम्ब्युलन्सद्वारे याभागातील आरोग्यसेवा अधिक बळकटीची गरज व्यक्त होत आहे.
इतर महत्वाची बातमी :