नंदुरबार : शहादा-तळोदा मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच, आता अजितदादांच्या शिलेदाराने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Shahada-Taloda Assembly Constituency : शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात महायुतीत संघर्ष पाहायला मिळत आहे. यामुळे भाजपच्या विद्यमान आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना रंगणार आहे. सर्वच इच्छुक उमेदवार विधानसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्यातच शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात (Shahada-Taloda Assembly Constituency) महायुतीत संघर्ष पाहायला मिळत आहे.
शहादा तळोदा विधानसभा मतदार संघात भाजपाचे (BJP) विद्यमान आमदार राजेश पाडवी (Rajesh Padvi) अडचणीत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे (Mohan Shewale) यांनी या मतदारसंघात उमेदवारीसाठी रणसिंग फुंकले आहे.
अब की बार स्थानिक आमदाराचा नारा
मोहन शेवाळे यांनी तळोदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत संवाद यात्रा सुरु केली असून ते संपूर्ण मतदारसंघात मतदार आणि कार्यकर्त्यांसमोर जाणार आहेत. यावेळी अब की बार स्थानिक आमदार, अशी घोषणा त्यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आले असून विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय वातावरण तापलं
शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनी बंड करत महायुतीच्या विरोधात भूमिका घेत बोरद येथे आपल्या समर्थकांचा संवाद मेळावा घेतला आहे. यावेळी शहादा तालुक्यातील स्थानिक आमदार अशी भूमिका घेतली असल्याने विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज आपली भूमिका जाहीर केली असून मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आता शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.
मंत्री विजयकुमार गावितांचे बंधू बंडखोरीच्या तयारीत
दरम्यान, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचे बंधू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आता नंदुरबारमध्ये रंगली आहे. कारण शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात राजेंद्रकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आता भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा