Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलंलं टोकाचं पाऊल, विष प्राशन करत आयुष्य संपवलं
Maratha Reservation: नांदेडमधील तरुणानं विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे.
Maratha Reservation Nanded : नांदेड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वात आरक्षणाची मागणी करत राज्यभरातील मराठा समाज (Maratha Samaj) एकवटला आहे. सर्व मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र होत आहे. अशातच आता मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नांदेडमधील एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील तरुणानं विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. नांदेडमधील हदगांव तालुक्यातील वडगाव इथल्या शुभम सदाशिव पवार या तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे. शुभमनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज हदगांव- तामसा इथे बंद पाळला जाणार असल्याची घोषणा गावागावांतील मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे.
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाचं टोकाचं पाऊल
मराठा आरक्षणासाठी बीडमधील (Beed) तरुणाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. शुक्रवार (20 ऑक्टोबर) रोजी या तरुणाने झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. जगन्नाथ यांच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.