Women's Day 2023 : पारंपरिक नक्षीसोबतच स्त्रिया, पर्यावरण, सामाजिक विषय; नांदेडमधील सत्तरीतल्या मुक्ताबाईंची नक्षीदार कला
Nanded News : नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या रामदास तांडा इथल्या मुक्ताबाई पवार वयाच्या सत्तरीतही न चुकता 8 ते 10 तास हाताने भरतकाम करतात.
Nanded News : मुक्ताबाई पवार, नांदेड (Nanded) जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या रामदास तांडा इथल्या. वयाच्या सत्तरीतही त्या न चुकता 8 ते 10 तास हाताने भरतकाम (Embroidery) करतात. मुक्ताबाई सांगतात की, "माझी आई रंगीबेरंगी धाग्यातून लेहंगा, कांचळी, घुंगटावर हाताने भरतकाम करायची. आईने आम्हाला कधी शिकवलं नाही. पण ते पाहून मी शिकले. घरात पडलेल्या चिंधीवरही काम केलं. हळूहळू याची आवड निर्माण झाली. हा माझा छंदच झाला. कामाची एवढी सवय झाली की, एक दिवस जरी खाडा पडला तरी, चुकल्या चुकल्यासारखं होतं." "गेल्या 50 वर्षांपासून मी हे काम करते पण, मला कधी थकवा जाणवत नाही. आता थोडी नजर कमजोर झाली आहे. पण, हात शांत बसत नाहीत," मुक्ताबाई सांगतात.
पारंपरिक नक्षीसोबतच स्त्रिया, पर्यावरण हे विषयही त्यांनी आपल्या कलेतून मांडले आहेत. "माझं शिक्षण झालं नसलं तरी माझे पती आणि मुलगा यांच्याकडून मला सामाजिक प्रश्न समजतात. समाजात काय घडतंय यावर मुलगा सातत्यानं सांगतो. त्यातून संकल्पना ठरते. मुलगा चित्र काढतो. त्यानुसार मी धागे भरते. एखादी कलाकृती तयार करण्यासाठी खूप दिवस लागतात. पण त्यातून मला आनंद मिळतो."
मुक्तबाईंच्या कलाकृतीला अनेक पुरस्कार
मुक्ताबाईंचे चिरंजीव दिनकर पवार सांगतात की, "यंत्राचा वापर न करता रंगीत धाग्यांच्या साहाय्याने आईने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी, किरण बेदी, सोनिया गांधी, अरुणा असफअली, कमलादेवी चटोपाध्याय, फातिमा बिबी, अमृता कौर, झाशीची राणी, सुचेता कृपलानी, पीटी उषा, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर अशा अनेक कर्तृत्ववान महिलांचं चित्र कलेतून साकारलं आहे. तिच्या या कलाकृतीला लघुउद्योग संस्था, राज्यपर्यटन विकास महामंडळ, सेंट्रल कॉटन इंडस्ट्री, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनातून पुरस्कार मिळाले आहे."
मुक्ताबाईंनी 250 महिलांना कला शिकवली
कलाकृतींना मोठी मागणी असूनही मुक्ताबाईंनी आपल्या कलेचा उपजीविकेचं साधन म्हणून कधीच उपयोग केला नाही. मात्र महिलांसाठी हे रोजगाराचं साधन होऊ शकतं, हे लक्षात घेऊन आजवर 250 महिलांना त्यांनी ही कला शिकवली. या कलेमुळे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना भेटण्याचा योग आला. ती आठवण मुक्ताबाईंनी सांगितली. "मी केलेले सर्व प्रकार त्यांनी हातात घेऊन पाहिले. त्यांनी माझं कौतुक केलं. माझे हात हातात घेऊन म्हणाल्या की शिवूनशिवून तुझी बोटं किती खराब झाली आहेत. काळजी का नाही घेत? त्यांच्या या बोलण्याने मला खूप भरुन आलं."
कलेचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी
ही कला जिवंत ठेवण्यासाठी अभ्यासक्रमात या कलेचा समावेश होण्याची मागणी त्या करतात. ओढणी, लेहंगा, लेडीज कोट, आधुनिक स्कर्ट, कांचळी, घुंगटो, अशा कलाकृतींची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने दखल घेतली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यांना हवामान बदलाशी संबंधित पृथ्वीवर स्त्री आणि वृक्ष नसतील तर, जीवसृष्टी नष्ट होईल, हे चित्र 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवरांनी मुक्ताबाईंच्या कलेला दाद दिली आहे.