Nanded News: पोराला निवडून आणता न आलेल्या विखे-पाटलांनी बेताल बोलू नये, जरांगेंवरील टीकेनंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा विखेंना इशारा
Maharashtra Politics: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन वाद पेटला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. विखेंना महाराष्ट्रात फिरु न देण्याची धमकी.
नांदेड: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन भरकटत चालले आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे एकटे म्हणजे मराठा समाज नव्हे, असे वक्तव्य करणारे राज्याचे महसूल मंत्री यांच्याविरुद्ध स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राधाकृष्ण विखे-पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही. त्यांनी असली बेताल वक्तव्यं करु नयेत. अन्यथा विखे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसारकर यांनी दिला.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना सुरक्षा देण्याची मागणी
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण केले. दरम्यान उपोषण सुटल्यानंतर आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे . यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी वडीगोद्रीतील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
राधाकृष्ण विखे-पाटील नेमकं काय म्हणाले होते?
महायुती सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले होते. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारी स्तरावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे काहीतरी मार्ग निघेल. लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडले. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे. मनोज जरांगे यांचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. आम्हीसुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले होते.
जालन्यातील गावात झळकला गावबंदीचा बॅनर
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात या आशयाचा फलक लावला आहे. जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आणखी वाचा
छगन भुजबळांची मनोज जरांगे पाटलांवर जहरी टीका; थेट जरांगेंचं शिक्षणच काढलं!
मराठा नेत्यांनी शहाणे होऊन आरोप बंद करावेत, तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल; जरांगे पाटलांचा सल्ला