(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल, नांदेडमधील खळबळजनक घटना
आरोपी दत्ता हंबर्डे यांनी आपल्या शर्टच्या खिशात आणलेली, चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावलीय. मात्र चप्पल डायसच्या अलीकडेच पडल्याने मोठा अनर्थ टळला.
Nanded News: नांदेड येथील जिल्हा न्यायालयात दरोडा आणि जबरी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला साक्ष देण्यासाठी बोलावले असता त्याने चक्क जिल्हा न्यायाधीशाच्या (प्रथम) दिशेने चप्पल भिरकावली. त्यामुळे नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात एकच गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकरणी न्यायाधीशांनी समय सूचकता दाखवली. यानंतर त्यांनी आरोपी दत्ता हंबर्डे याला सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा जाग्यावरच सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयातील या घटनेमुळे न्यायालय परिसरात दिवसभर याच प्रकरणाची चर्चा सुरू होती.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विष्णुपुरी येथील आरोपी दत्ता हरी हंबर्डे याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी यासह अनेक गंभीर गुन्हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तो मागील काही दिवसांपासून नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला व त्याच्या इतर साथीदाराला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) यांच्या न्यायालयासमोर साक्षीसाठी बोलावण्यात आले होते.
चप्पल डायसच्या अलीकडेच पडल्याने मोठा अनर्थ टळला
साक्ष सुरू असतानाच आरोपी दत्ता हंबर्डे यांनी आपल्या शर्टच्या खिशात आणलेली, चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावलीय. मात्र चप्पल डायसच्या अलीकडेच पडल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा व न्यायालयीन कर्मचारी चांगलेच घाबरले. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन बाजूला घेतले. यावेळी न्यायाधीशांनी आरोपीला चप्पल भिरकावल्याप्रकरणी जागेवरच कुठलाही युक्तिवाद न करता आपल्या अधिकारात सहा महिने शिक्षा आणि एक हजार रुपये दंड आणि एक हजार रुपये दंड नाही भरल्यास वाढून एक महिन्याची शिक्षा सुनावलीय.
न्यायालयातील सुरक्षेचा व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या प्रकरणामुळे मात्र न्यायालयातील सुरक्षेचा व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा कारागृहातून आरोपींची तपासणी व अंगझडती न घेता तसेच न्यायालयात हजर करण्यात आल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणाची सध्यातरी पोलीसात नोंद करण्यात आली नव्हती. कारागृहातून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले, त्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मात्र घबराट पसरली आहे. नक्कीच या पोलिसांवर न्यायालय व पोलीस विभागाकडून काय कारवाई होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ही बातमी देखील वाचा