Malegaon Yatra: नांदेडच्या माळेगाव यात्रेची का होते राज्यभर चर्चा? दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या यात्रेत काय असतं खास...
Nanded Malegaon Yatra: नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारी,ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारी यात्रा.
![Malegaon Yatra: नांदेडच्या माळेगाव यात्रेची का होते राज्यभर चर्चा? दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या यात्रेत काय असतं खास... Malegaon Yatra Nanded Maharashtra Know about all south india big mela Malegaon Yatra: नांदेडच्या माळेगाव यात्रेची का होते राज्यभर चर्चा? दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या यात्रेत काय असतं खास...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/6bdf9d1a19ea778770543c1a2296c3ac167206137064884_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded Malegaon Yatra: नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव (Loha malegaon Yatra) येथील खंडोबा यात्रा (Khandoba Yatra) ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून दशकांपासून ओळखल्या जाते. दरम्यान या यात्रेस घोड्याचे माळेगाव तर गमतीने उचल्याचे माळेगाव म्हणून ओळखल्या जाते. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा,गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेशसह देशभरातून उंट, घोडे,गाढव, खेचर, कुत्री, गाय, म्हैस, बैल घेऊन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येत असतात. यात्रेतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यामुळे यात्रेने गर्दीचा उच्चांक
दक्षिण भारतातील सर्वात मोठी नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगावची यात्रा गेल्या चार दिवसांपासून सुरु झाली आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यामुळे यात्रेने गर्दीचा उच्चांक गाठला. तर भाविकांचीही मांदियाळी पाहायला मिळतेय. या यात्रेत महाराष्ट्र ,तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, पंजाब,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशसह देशभरातील ग्रामीण भागातील शेतकरी,व्यापारी, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.
ग्रामीण भागातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक या यात्रेत आपला व्यवसाय थाटून त्यातून उत्पन्न आणि रोजगार मिळवतात. खेड्या पाड्यातील लोहार, कुंभार, घीसडी, सुतार, चांभार, धनगर असे बारा बलुतेदार या यात्रेतून आर्थिक देवाण घेवाण करून रोजगार मिळवतात. दरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या माळेगाव यात्रेत छोटे मोठे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
ग्रामीण उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न
खेड्या पाड्यातील वाडी,तांड्यावर ग्रामीण भागात निर्मिती होणारी आणि दैनंदिन जीवनात उपयोगात येणारी अडकित्ता, चाकू, विळा,विलती, घुंगरमाळ, वाद्य, घुंगरू, काठ्या, पोळीपाट, बेलने, काठवट ही साहित्य विक्रीची दुकाने थाटून ग्रामीण उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न होतोय.दरम्यान कोरोना महामारी, अतिवृष्टी, ओला दुष्काळ नैसर्गिक संकटामुळे मरणासन्न असवस्थेत असणाऱ्या परंपरागत ग्रामीण उद्योगास शासनानेही हातभार लावणे गरजेचे आहे.ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा असणाऱ्या या यात्रेत ग्रामीण कारागीर व व्यावसायांना चालना देऊन शासनाने उभारी देणे गरजेचे आहे.
माळेगाव यात्रेत आंबट शौकिनांसोबत पोलिसही बॉम्बे डान्स पाहण्यात मशगुल
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेत बॉम्बे डान्सच्या नावाने अश्लील नृत्य व चित्र विचित्र अंग विक्षेप करून आंबट शौकिनांसाठी चंगळ सुरू झालीय. या यात्रेत ऑर्केस्ट्रा, पुण्याची मैना,झंकार ऑर्केस्ट्रा,बॉम्बे डान्सच्या नावाने अश्लील चाळे केले जात आहेत. दरम्यान हा सर्व प्रकार नांदेड पोलिसांसमक्ष घडत असून या अश्लील चाळ्याची मैफिलीत पोलिसही हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान या बॉम्बे डान्सच्या पाच मिनिटाच्या शोसाठी ग्रामीण भागातील तरुण आपले खिसे रिकामे करत आहेत. तर या बॉम्बे डान्समध्ये आंबट शौकीन तरुण पोलिसां समक्ष रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. या अश्लील बॉम्बे डान्स विषयी नागरिकांनी आक्षेप घेतलाय. याविषयी नांदेड पोलीस अधीक्षक कृष्णकुमार कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बॉम्बे डान्स या प्रकारास पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नसून नांदेड जिल्हा परिषदेने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिलीय.पण यावर कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तर जिल्हा परिषद नांदेडने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)