(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada: मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?
Marathwada : छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे.
Marathwada Unseasonal Rain : मागील गेल्या दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) होत असलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात देखील अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं होते.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बुधवारी सोयगाव आणि पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ज्यात सोयगाव तालुक्यातील (Soygaon Taluka) आमखेडा आणि जरंडी परिसरात अर्धा तास पाऊस सुरु होता. तर वादळी आणि गारपिटीच्या पावसाने केळी, गहू, ज्वारी आणि मका पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केलं आहे. सोबतच आमखेड्यात तीन घरावरील पत्रे उडाल्याने अंदाजे 17 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
जालना : जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक गारपीट सुरु झाल्याने शहरी भागातील नागरिकांचीही चांगलीच धावपळ उडाली होती. तर दोन दिवसांत जिल्ह्यातील जवळपास सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. जालना, जाफराबाद, घनसावंगी, अंबड तालुका आणि परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गारपीट झाली. त्यामुळे रब्बीतील पिकांसह फळपिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे..
हिंगोली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी हिंगोली शहरवगळता जिल्ह्यात पाऊस झाला. परंतु, बुधवारी सायंकाळी मात्र हिंगोली शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर आकाशात ढग जमायला सुरुवात झाली आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे गारांचा पाऊस झाला. दरम्यान सायंकाळी सहा वाजेदरम्यान हिंगोली शहरासह बासंबा, नर्सी (नामदेव), कडोळी, कनेरगावनाका, कळमनुरी, औंढा नागनाथ आदी ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात कडोळी येथे तर सखल भागात यामुळे पाणी साचल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
नांदेड : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाचा बागायती पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. अर्धापूर, माहूर या तालुक्यात बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. याच भागात गारपीट झाली. अर्धापूर आणि माहूर या दोन तालुक्यांत मिळून सुमारे 650 हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर हिमायतनगर, कंधार या तालुक्यांमध्ये काढून ठेवलेली हळद पावसाने भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अर्धापूर तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बुधवारी तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात 150 हेक्टरवरील केळीच्या बागा आडव्या झाल्या, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय 20 ते 22 हेक्टर क्षेत्रावरील पपईच्या बागा आणि 3 ते 4 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे.
परभणी : जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीने थैमान घातले असल्याचे चित्र आहे. पूर्णा तालुक्यानंतर बुधवारी मानवत, सेलू जिंतूर तालुक्यातील अनेक गावांत गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. बऱ्याच ठिकाणी घरांवरील, शाळांवरील पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडली. विद्युत खांब कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी झालेल्या गारपिटीमुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Marathwada Weather : मराठवाड्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाचा अंदाज