(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded News : नांदेडच्या किनवटमध्ये डीजेवरुन दोन गटात वाद, दगडफेक आणि हाणामारी; शहरात सर्वत्र शांतता
Nanded News : अफवा पसरवून शांतता भंग करू नये अन्यथा अफवा पसरवणाच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
Nanded News : क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादाच्या घटना गेल्या काही दिवसात वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) किनवट शहरात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. लग्नकार्यात लावण्यात आलेल्या डीजेवरुन दोन गटात वाद झाला असल्याचे पाहायला मिळाले. रविवारी रात्री किनवट शहरातील गंगानगर येथे एका लग्नाच्या हळदी कार्यक्रमात गाणे वाजवल्यावरुन दोन गटात तेढ निर्माण होऊन दगडफेक आणि हाणामारी झाली. यात अनेकांचे डोके फुटले असून हाताला मार लागला आहे. याप्रकरणी किनवट पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल केले आहेत. तर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, भोकरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे, अर्धापूरचे सहपोलीस अधीक्षक गोहर हसन हे किनवट येथे दाखल झाले होते. दोन्ही गटातील 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, 14 मे रोजी रात्री साडेदहा वाजता गंगानगर येथे लग्न समारंभ पूर्वी हळदीचा कार्यक्रम होता. डीजेवर गाणे वाजणे सुरु होते. तेवढ्यात इस्लामपुरा येथील दहा जण आले आणि गाणे का वाजवत आहेत, असे म्हणताच बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. यात कोणाच्या डोक्याला तर कोणाच्या हाताला मुका मार लागला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. तर या घटनेनंतर किनवट ठाण्यात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे, अर्धापूरचे सहपोलीस अधीक्षक गोहर हसन किनवटचे उपाधीक्षक विजय डोंगरे हे तळ ठोकून बसले होते.
अफवा पसरवून शांतता भंग करु नये
हळदी कार्यक्रमात डीजे वाजत असताना दुसऱ्या गटाने आवाज कमी करा असे जाऊन सांगितले असता नऊ जणांनी दगडफेक केली. दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन किनवट पोलिसांनी गुन्हे दाखल करुन एका गटाचे सात आणि दुसऱ्या गटाचे चार अशा 11 जणांना ताब्यात घेतले आहे. घटना किरकोळ असून शांतता कायम आहे. अफवा पसरवून शांतता भंग करु नये अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
क्षुल्लक गोष्टी ठरतायत वादाचे कारण...
गेल्या काही दिवसात राज्यात घडणाऱ्या वादाच्या घटना पाहता, क्षुल्लक कारणावरुन असे वाद होत असल्याचे समोर येत आहे. कुठे गाडीचा धक्का लागला, तर कुठे डीजेवरील गाणे असे या वादाचे कारण ठरत असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वाद पडदा टाकण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला पाहिजे. सोबतच असे वाद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र असे असलं तरीही स्वतः पोलीस देखील अशा सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांकडून शहरात रेड अलर्ट