Nanded: 'प्रतिशिवाजी' म्हणून ओळख असणाऱ्या नेताजी पालकरांचे समाधी स्थळ उपेक्षित
Nanded News: अधिकाऱ्यांना समाधीस्थळी चक्क ट्रॅक्टरद्वारे जाण्याची वेळ आली.
Nanded News: स्वराज्याची निव रोवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जे दिर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. ज्यांची इतिहासा 'प्रतिशिवाजी' म्हणून ओळख होती, त्या शूर नेताजी पालकरांचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे असणारे स्मृतिस्थळ शेकडो वर्षांनंतरही सोयीसुविधांअभावी उपेक्षित आहे.
1620 साली खालापूर जिल्हा रायगड येथे जन्म झालेल्या व 1681 साली मृत्यू झालेल्या नेताजी पालकरांचे स्मृतीस्थळ हदगाव तालुक्यातील तामसा येथे आहे. परंतु तब्बल 450 वर्षांनंतरही हे स्मृतिस्थळ जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोयीसुविधांअभावी अद्यापही उपेक्षित आहे. आजही स्मृतिस्थळाकडे जाण्यासाठी व्यवस्थितपणे रस्ता नाही.
तामसा येथील सरनौबत नेताजी पालकर यांच्या स्मृतीस्थळाचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समिती मधील बैठीकीत चर्चा झाली. त्यामुळे तामसा येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आढावा घेण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी परदेशी, निवासी ऊपजिल्हाधिकारी कुलकर्णी, उपविभागिय अधिकारी ब्रिजेश पाटिल, तहसीलदार जिवराज डापकर आदी अधिकारी पोहचले. मात्र या स्मृतीस्थळावर पोहचण्यासाठी त्यांना चक्क ट्रॅक्टरद्वारे नदी, नाल्यांच्या पाण्यातून प्रवास करत व जंगल तुडवत पोहचावे लागले. त्यामुळे स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या सरनौबतांच्या स्मृतीस्थळी जाण्यासाठी 450 वर्षांनंतरही साधी वाटही नसावी ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
फक्त आश्वासने...
यापूर्वी अनेकदा पालकर यांच्या समाधीचा जीर्णोद्धाराचा मुद्दा समोर आला. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांच्या पलीकडे काहीच झाले नाही. 2021 मध्ये तत्कालीन बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांचे या बाबीकडे लक्ष वेधले असता त्यांनी जीर्णोद्धाराचे आश्वासन दिले होते. पण पुढे प्रत्यक्षात काही झाले नाही. त्यापूर्वी याच घराण्यातील गणपतराव पालकर हे आमदार असताना व जिल्ह्याचे तत्कालीन खासदार केशवराव धोंगडे यांनी शासन दरबारी प्रयत्न केला होता. तर तामसा येथील मूळचे राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी असताना त्यांनी या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाठपुरावा केला, पण यश आले नाही.
अफजलखानाच्या सैन्याला लावलं होते हुसकावून...
पालकरांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरे शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते. त्यांचा जन्म खालापूर येथील चौक या गावी झाला. पालकरांनी अनेक युद्धे गाजवली. विशेष म्हणजे अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र आज त्यांच्या स्मृतीस्थळी जाण्यासाठी वाट शोधावी लागतेय.