Lumpy Skin Disease : एकीकडं अतिवृष्टी तर दुसरीकडं लम्पी स्कीनमुळं दुग्ध व्यवसायावर परिणाम, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
लंम्पी चर्मरोगामुळं नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट आलं आहे. एकीकडं अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान तर दुसरीकडं लम्पी रोगामुळं दुधाच्या जोड धंद्यावरही मोठा परिणाम झाला आहे.
Lumpy Skin Disease : सध्या देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजारानं (Lumpy Skin Disease) थैमान घातलं आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहे. दिवसेंदिवस लम्पी स्कीनचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्यातही लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. लंम्पी चर्मरोगामुळं नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर (Farmers) दुहेरी आर्थिक संकट आलं आहे. एकीकडं अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं लम्पी रोगामुळं दुधाच्या जोड धंद्यावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांचा जोडधंदा असणाऱ्या दुग्ध व्यवसावरही गंडांतर
लम्पी आजारामुळं जनावरांचं दुधाचं प्रमाण घटत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सुरुवातीला बियाणांच्या वाढत्या किंमती, बोगस बियाणं, अतिवृष्टी यामुळं शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. तर आता शेतकऱ्यांचा जोडधंदा असणाऱ्या दुग्ध व्यवसावरही गंडांतर आलं आहे. कारण जनावरावरील लम्पी आजारामुळं शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकण्याची वेळ आली आहे. तर ही जनावरे खरेदीदारही खरेदी करण्यास तयार नाहीत. तर आजारी जनावरांचे दूधही आता बाजारात विकत घेतलं जात नाही. त्यामुळं शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत. लम्पी स्कीन आजारामुळं जनावरांचा बाजार बंद आहेत. तर बैल, शेळ्यांसह दुभत्या जनावरांची खरेदी कमी झाली आहे. तर भीतीपोटी दुग्ध व्यवसाय आणि मटण व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, दुग्ध व्यवसायावर आधारित असणारे इतर उद्योगही प्रभावित झालेत. ज्यामध्ये दूध, दही, पनीर व्यवसाय, खवा, तूप, हॉटेल व्यवसाय, मटण व्यवसाय, जनावरांचे बाजार, शेती व्यवसाय या सर्वांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील 19 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव
सध्या राज्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहेत. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून खबरदारीची पावलं उचलण्यात येत आहेत. राज्यातील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच राज्यात आणि परराज्यात जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. तर पुढील आदेश येईपर्यंत जनावरांचे बाजार आणि जत्रा बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Lumpy Skin Disease : राज्यातील 19 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, जनावरांचे बाजार आणि जत्रा बंद, लसीकरणाच्या सूचना
- Lumpy Skin Disease : राज्यातील 18 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, प्रशासन सतर्क, राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित