Nanded News: नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारली, आई-वडिलही घरात मृतावस्थेत आढळले, घटनेनं पोलीसही चक्रावले
Nanded News: नांदेडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Nanded News नांदेड: नांदेडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला (Nanded News) आहे. दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई-वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. आई-वडिलांचा घातपात की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.
नेमकी घटना काय? (Nanded Crime News)
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील ही दुर्दैवी घटना आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस प्रशासन चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. चारही जणांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.
मृतांची नावे आणि वय- (Nanded News)
उमेश रमेश लखे, वय 25 वर्षे (मुलगा)
बजरंग रमेश लखेस वय 22 वर्षे (मुलगा)
रमेश सोनाजी लखे, वय 51 वर्षे (वडील)
राधाबाई रमेश लखे, वय 45 वर्षे (आई)
घटनेमुळे गावावर शोककळा- (Nanded News)
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावातील चौघांचे मृतदेह आज आढळले. गावातील रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांच्या उमेश अन रमेश या दोन मुलांचे मृतदेह मुगट इथल्या रेल्वे रुळावर आढळले. ही घटना आर्थिक विवंचनेतून घडल्याला अंदाज गावातील सरपंच प्रतिनिधीने व्यक्त केलाय. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
Gadhchiroli News: आईची अब्रू लुटताना चिमुकल्याची हत्या, गडचिरोतील घटना
विवाहितेवर अत्याचार करताना तिच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा तोेंड दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला अहेरीचे अतिरिक्त सत्र न्या. प्रकाश आर. कदम यांनी बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. मुलचेरा तालुक्यातील ही घटना असून तब्बल सात वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. संजू विश्वनाथ सरकार (रा. कांचनपूर ता. मुलचेरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही पती, तीन वर्षांच्या मुलासोबत राहत होती. जून 2017 मध्ये तिचे पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेले होते. तेव्हा मुलगा आणि पीडित महिला दोघेच घरात असल्याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री घरात प्रवेश करून अत्याचार केला आणि चिमुकल्याची हत्या केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांनी आरोपीला कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा तर बलात्कार व खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यासोबतच पीडित महिलेला विधिसेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले.
























