Ravindra Chavan : महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉल पाळावा, हक्कभंगाची नोटीस देणार, नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांचा इशारा
Ravindra Chavan : नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेकडून माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नसल्याचं म्हटलं.

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचं प्रकरण गेल्या आठवड्यात चर्चेत होतं. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोर दिलगिरी व्यक्त केली होती. त्या प्रकरणानंतर नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण नांदेड महापालिकेच्या आयुक्तांना प्रोटोकॉलची आठवण करुन दिली आहे. महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे. खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई सुरु करण्याबाबतचे पत्र देणार असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांना मिळालेलं नसल्यानं ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉल पाळावा : रवींद्र चव्हाण
हरित क्रांतीचे जनक राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडणार आहे. नांदेड महापालिकेचा हा कार्यक्रम आहे. प्रोटोकॉल म्हणून लोकप्रतिनिधीला आमंत्रण देणे बंधनकारक असते, असे असताना या कार्यक्रमाचे आमंत्रण नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आलेलं नसल्याचे सांगितले. मला महापालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्याचा फोन आलेला नाही. महापालिकेने प्रोटोकॉल पाळायला पाहिजे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. खासदार म्हणून मला हक्कभंगा संदर्भातील कारवाई करण्याचा अधिकार आहे. उद्या मी पत्र देणार असल्याचा इशारा देखील रवींद्र चव्हाण यांनी दिला.
काँग्रेसनं अशोक चव्हाण यांच्या घराण्याला मोठं करण्याचं काम 50 वर्ष केलं. काँग्रेसनं त्यांना मोठी मोठी पदं देण्याचं काम केलं.
अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा काँग्रेसच्या जनतेनं आणि काँग्रेसच्या मंडळींनी वसंतराव चव्हाण यांना लोकसभेला जिंकवून दाखवलं. त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी मला जिंकवून दाखवलं. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा नेता आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व निवडणुका जिंकवून दाखवेल, असा विश्वास आहे.
बी. आर. कदम यांच्या राजीनाम्यासंदर्भात रवींद्र चव्हाण म्हणाले की, त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही की कुठं जाणार आहे. बी. आर. कदम यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीला ते कुठं जाणार हे सांगितलेलं नाही. बी. आर. काका यांनी काँग्रेससाठी 40 वर्ष काम केलं आहे. ते पक्ष बदलणार आहेत हे तुमच्या माध्यमातून ऐकत आहोत. पक्ष सोडण्याचं कारण त्यांनी सांगावं, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

























