Mumbai Ro Ro Services : ना रेल्वे तिकीटांचा तुटवडा, ना गोवा महामार्गावरील ट्रॅफिकचा तास; समुद्रमार्गाने मुंबई ते मालवण चार तासात प्रवास होणार
Mumbai To Kokan Ro Ro Services : जलमार्गाने जाणाऱ्या रोरो बोटीतून एकाच वेळी 500 प्रवासी आणि 150 गाड्यांचा प्रवास शक्य होणार आहे. कोकणात जाण्यासाठी आता फक्त चार तास पुरेसे होणार आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना यंदा रेल्वे तिकिटांचा तुटवडा, महामार्गावरील रखडलेली कामं किंवा वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. कारण आता मुंबईहून थेट कोकणात जलमार्गे म्हणजेच रोरो बोटने अवघ्या चार ते साडेचार तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. ही रोरो बोट भाऊच्या धक्का येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलवर दाखल होणार असून मुंबई ते मालवण अशी चाचणी देखील करण्यात येणार आहे.
ही बोट M2M कंपनीची 55 कोटींची अत्याधुनिक रोरो बोट असून सागरी महामंडळाच्या सहकार्याने लवकरच ही सर्वसामान्याच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. रोरो बोट एकाच वेळी 500 प्रवासी आणि 150 वाहने घेऊन प्रवास करू शकते. विशेष म्हणजे, बोटीचा वेग 24 नॉटिकल माइल्स असून, ती अवघ्या चार ते साडेचार तासांत मुंबईहून रत्नागिरी, मालवण व विजयदुर्ग या ठिकाणी पोहोचू शकते.
Mumbai To Kokan Ro Ro Services : खासगी गाड्याही घेऊन जाता येणार
ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांसोबत त्यांची खासगी वाहनेही कोकणात जाता येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा प्रवास, इंधन खर्च आणि थकवा टळणार आहे. पावसाळ्यात सुद्धा जलवाहतूक शक्य होईल यासाठी ही बोट विशेष तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
या बोटीची चाचणी या आधी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते मांडवा मार्गावर घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. यामुळे अनेक वर्षांनंतर मुंबई ते कोकण जलवाहतूक मार्ग पुन्हा खुला होणार आहे. या सेवेमुळे कोकणात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आता जलमार्गाने आरामदायक आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
Mumbai To Kokan Ferry Boat Services : एम टू एम बोट मुंबईत दाखल
गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवास. हा त्रास नेहमीचाच झाला आहे. आता या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम बोट वापरली जाणार आहे.
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. यासंबंधी लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:


















