
Nanded News: बाफना गोळीबार घटनेतील फिर्यादी महिलाच बनली आरोपी, दोघांना फसविण्यासाठी रचला कट
Nanded News: सविता गायकवाड या महिलेने दोघा भावांना फसविण्यासाठी आपल्या साथीदाराकडून चक्क स्वतःवरच गोळीबार करून घेतल्याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता फिर्यादीच आरोपी झाली आहे.

नांदेड : नांदेड (Nanded News) शहरातील बाफना ओव्हरब्रीजवर सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. या प्रकरणात गायकवाड यांच्या तक्रारीवरून दोन भावांच्या विरोधात इतवारा पोलिसांनी गुन्हाही नोंद केला होता. परंतु सुरुवातीपासूनच पोलिसांना घटनाक्रमाबाबत संशय होता. दरम्यान पोलीस तपासात सविता गायकवाड या महिलेने दोघा भावांना फसविण्यासाठी आपल्या साथीदाराकडून चक्क स्वतःवरच गोळीबार करून घेतल्याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता फिर्यादीच आरोपी झाली आहे.
कॉंग्रेस कार्यकर्त्या असणाऱ्या सविता गायकवाड आणि आतिक खान यांच्या विरोधात सहा महिन्यांपूर्वी भोकर पोलिस ठाण्यात आयशर चोरी प्रकरणात गुन्हा नोंद होता. त्या प्रकरणात परभणी येथील रहीम खान हे साक्षीदार होते. या घटनेचा राग मनात धरून 6 जानेवारी रोजी सविता गायकवाड आणि फैसल हे खासगी वाहनाने रात्री परभणीला गेले. तिथे रहीम खान आणि सविता गायकवाड यांच्यात वाद झाला. त्यानंतर रहीम खान यांनी परभणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून सविता गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान या घटनेचा राग मनात धरून सदर व्यक्तींना फसविण्यासाठी सविता गायकवाड यांनी बनाव केला. ज्या परभणीच्या दोघा भावांना धडा शिकविण्यासाठी महिलेने 9 जानेवारी रोजी गोपीनाथ बालाजी मंगल, किरण सुरेश मोरे (दोघे रा. धनेगाव), अवधूत ऊर्फ लहूजी गंगाधर दासरवाड (रा. बळीरामपूर), विकास कांबळे (रा. हदगाव) यांना फोन करून घरी बोलावले. घरी आल्यानंतर बनाव रचला. तुम्ही पिस्टल घेऊन बाफना येथे या आणि मला गोळी मारून निघून जा, असे सांगितले. त्यानुसार सोमवारी रात्री आपल्या साथीदाराकडूनच तिने स्वतःवर गोळी झाडून घेतली.
दरम्यान बाफना ब्रिज परिसरात सीसीटीव्ही नाही याची खात्री आरोपींनी केली होती. यानंतर दोघेजण हे येणाऱ्याा- जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवून होते. रात्री अकरा वाजता ब्रीजवर कुणीही नसताना गायकवाड हिने सांगितल्याप्रमाणे डाव्या दंडावर गोळी झाडून पळ काढला होता. वाहन खरेदी विक्रीच्या वैयक्तिक भांडणातून व पूर्ववैमनस्यातून ही जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता.सदर महिलेवर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
