(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Food Day : विष्णू मनोहर करणार 2 हजार 500 किलो कुरकुरीत 'महा-चिवडा' विक्रम
चिवडा केवळ दिवाळीतच नाही, तर वर्षभर घरोघरी होतो. म्हणून दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विष्णू मनोहर यांनी यावेळी सांगितले.
Nagpur : जागतिक अन्न दिनानिमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (vishnu Manohar) 16 ऑक्टोबर रोजी तब्बल अडीच हजार किलो कुरकुरीत महा-चिवडा विक्रम करणार आहे. अशी माहिती विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा विष्णू मनोहर यांचे महा-चिवडा हे 14 वे विक्रम असून यापूर्वी त्यांनी पराठा, कबाब, मसाले भात, खिचडी, साबुदाना उसळ, भरीत आदींचे विक्रम आपल्या नावी केले आहे.
दिवाळी म्हटली की लाडू, चकल्या आणि शेव चिवड्याशिवाय होत नाही. त्यातही चिवडा आवडता असतो. चिवडा केवळ दिवाळीतच नाही. तर वर्षभर घरोघरी होतो. म्हणून दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विष्णू मनोहर यांनी यावेळी सांगितले.
'महा-चिवडा'साठी लागणारे साहित्य
या महा-चिवडा उपक्रमासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून 600 किलो चिवडी आणली आहे. चिवड्यासाठी लागणारे जिन्नस असे : शेंगदाणा तेल 350 किलो, शेंगदाणे 100 किलो, काजू व किसमिस 100 किलो, डाळवा व खोबरे प्रत्येकी 50 किलो, हिंग व जिरे पावडर प्रत्येकी 15 किलो, मिर्ची पावडर 40 किलो, कढीपत्ता व सांभार प्रत्येकी 100 किलो, वाळलेले कांदे 50 किलो, धने पावडर 40 किलो साहित्याची तयारी केली आहे. याची पूर्व तयारी एक दिवसाआधीपासून सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना सात ते आठ सहकारी मदत करतील
उपक्रमास भेट देणाऱ्यांना निःशुल्क वाटप
सहा हजार किलोची एक भव्य कढई आणि तीन हजार किलोची दुसरी कढईच्या मदतीने तयारी करण्यात येईल. हा चिवडा तयार करण्यात आल्यावर याचे 250 ग्राम प्रत्येकी असे पाकीट तयार करण्यात येणार आहे. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरजू-गरीबांना याचे वाटप करण्यात येईल. याशिवाय 16 ऑक्टोबर रोजी उपक्रम बघण्यासाठी येणाऱ्यांनाही पाकीट निःशुल्क देण्यात येणार आहे. शहरातील संस्थांसह गडचिरोली येथील एका संस्थेलाही ही पाकीटे गरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी देण्यात येणार आहे.
विष्णूंनी मोडला होता स्वतःचाच विक्रम
गणेशोत्सवानिमित्त नुकतेच विष्णू मनोहर यांनी नागपुरातच 2500 किलो तळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे वितरण केले होते. मनोहर यांचा चिवड्याचा हा 14 वा विश्व विक्रम राहणार आहे. सलग 53 तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. 5 फूट लांब आणि 5 फूट रुंद असा 'सर्वात लांब पराठा' तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात 7000 किलोची 'महा मिसळ' तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी भारतात 3200 किलो वांग्याचे भरीत तयार करून जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी 3000 किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर 5000 किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या