(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Police Sagar Ghorpade : खाकीतल्या गायकाचा 'देश मेरे' गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल; नेटकऱ्यांना आवाजाची भूरळ
सद्क्णय खलनिग्रहणाय म्हणत नागरीकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असलेल्या पोलिसाच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Pune Police Sagar Ghorpade : 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणत नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असलेल्या पोलिसाच्या (pune police) गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुणे पोलिसांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात अभिनेता अजय देवगणच्या (Ajay devgan) भुज या चित्रपटातील गाणं पुणे पोलीस कॉन्स्टेबलने गायलं आहे. सागर घोरपडे (sagar Ghorpade) असं या पोलिसांचं नाव आहे. सध्या ते पुण्याच्या गुन्हा शाखेत कार्यरत आहेत.
अवघ्या एक मिनिटाहून अधिक लांबीच्या या व्हिडीओमध्ये सागर घोरपडे 'देश मेरे' हे गाताना दिसत आहे. 2021 च्या चित्रपटातील गाण्याच्या त्याच्या भावपूर्ण सादरीकरणाने अनेकांना भूरळ घालती आहे. व्हिडीओमध्ये घोरपडे मायक्रोफोनसमोर उभे राहून चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. देशाला गाणे समर्पित करण्यासाठी विशेष दिवसाची गरज नाही. देश मेरे..' आमच्या पोलीस कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांनी सुंदर गायले आहे.", असं कॅप्शन पुणे पोलिसांनी ट्वीट करताना दिलं आहे.
हा व्हिडीओ 10 ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आला होता आणि या व्हिडीओने नेटकऱ्यांना भूरळ घातली आहे. नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. काही लोकांचा आवाज इतका मंत्रमुग्ध करणारा असतो की ते व्यावसायिक गायक नसले तरीही श्रोत्यांना थक्क करून सोडतात. 2021 च्या भुज: द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटाचा भाग असलेल्या 'देश मेरे' या गाण्याने आम्हाला वेड लावलं आहे, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
देशाप्रती गाणे समर्पित करण्यासाठी विशेष दिवसाची गरज भासत नाही..🇮🇳
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) October 10, 2022
‘Desh mere..’ sung beautifully by our #PunePolice Constable Sagar Ghorpade ..#MondayMotivation pic.twitter.com/7eszAGf9f8
सागर यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 9 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोलिसाची नोकरी करत असताना त्यांनी त्यांची कलादेखील जोपासली आहे. त्याच्या गाण्याचं पुण्यातील प्रत्येक पोलिसांना कौतुक आहे. 24 तासांची नोकरी करत आपली कला जोपासनं त्यातून अनेकांना आनंद देणं ही सोपी बाब नाही. मात्र वेळात वेळ काढून सागर गातात आणि अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतात.
गुन्ह्याचा छडा लावण्यात पुणे पोलीस अग्रेसर
पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. मोठ्या टोळ्यादेखील सक्रिय आहे. या टोळ्यांना आळा घालण्यासाठी पुण्यातील गुन्हे शाखेचे प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जीवापार प्रयत्न करत आहे. अनेकदा माहिती मिळाल्यावर रात्रीबेरात्री गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रवाना होतात. तर अनेकदा तातडीने सापळा रचून गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवतात. चोरी, खून, अपहरण या प्रकरणातील कोयते, चाकू सुरी यांचा शोध घेण्यासाठी जीवावर बेतून कार्यरत असतात. गुन्ह्याचा छडा लावण्यात पुणे पोलीस अग्रेसर आहेत.