'ईडी महाराजांची कृपा झाली, अन् नवीन देव हृदयात आला'; विजय वडेट्टीवारांचे अजित पवारांवर टीकास्त्र
Vijay Wadettiwar : ईडी महाराजांची कृपा अशी झाली, तो देव बाजूला जाऊन नवीन देव हृदयात आला, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे
Vijay Wadettiwar नागपूर : अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच अजित पवारांनी शरद पवारांवरदेखील टीका केली आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे. ईडी महाराजांची कृपा अशी झाली, तो देव बाजूला जाऊन नवीन देव हृदयात आला, असे त्यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्यांच्या नजरेत शरद पवारांसारखा (Sharad Pawar) नेता उदयापासून अष्टाकडे जाताना सोबत होता. शरद पवारांना देव मानत होते. मात्र ईडी महाराजांची कृपा अशी झाली, तो देव बाजूला जाऊन नवीन देव हृदयात आला. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणतील आतंकवादी म्हणतील. काहीही म्हणू शकतात. एकीकडे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भावना नसेल हे आंदोलन संपवण्याचे काम सुरू आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ज्यांच्या भरोशावर जगत आहोत. त्या शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. उद्योगपतींचे चोचले बोलून गरिबांना पायदळी तुडवण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
...तर महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करू
शासनाने काढलेला जीआर अनुकंपा धारकावर अन्याय करणारा आहे. प्रतीक्षा यादीत असताना 2005 नंतर नियुक्त्या झाल्या. त्यांच्या संदर्भात कुठलाही उल्लेख नाही, त्यांचा समावेश करावा. जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जीआरमध्ये डावलण्यात आले आहे. पेन्शनधारकांची लढाई नव्याने लढावी लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर बनवाबनवी करत कर्मचाऱ्यांच्या तोंडाचे पाने पुसण्याचे काम सरकारने केले. आमचे सरकार सत्तेत आले तर महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करू, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
शेतकरी सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही
कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातोय. अत्याचारी सरकार इतिहासात पहिल्यांदा दिसून येत आहे. अन्नदात्याचे श्राप लागतील हे नालायक सरकार संपल्याशिवाय राहणार नाही. टोमॅटो दाखवून बॉक्समध्ये कांदा निर्यात केला जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे. एमएसपीच्या नावावर क्विंटल मागे लूट सुरू आहे. कापसात लावलेल्या जाचक अटींमुळे कापूस खरेदी सेंटरवरून ट्रक परत न्यावे लागत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
तीन पक्षाच्या स्पर्धेमध्ये राज्य अधोगतीकडे
बबनराव तायवाडे बोलले ते खरं आहे, मनोज जरांगे पाटलांची अशा पद्धतीची भाषा करण्याची हिंमत कशी होते तो कायद्याचा बाप आहे का? कायदा सगळ्यांसाठी समान आहे. हा काही हुकूमशहा नाही की कोणी कोणाविरुद्ध बोलू नये. आमदार गोळीबार करत आहे. कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. राज्यात रोज तासाला तीन बलात्कार आणि दिवसाला सहा खून होत आहे. तीन पक्षाच्या स्पर्धेमध्ये राज्याला अधोगतीकडे नेले जात असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा