Heat Wave : अकोल्यात उष्णतेचा पारा 44.4 सेल्सिअसवर, अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा
Heat Wave in Vidarbha : मागील दोन ते तीन दिवसात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले आहे. अशातच आज विदर्भातील अकोला जिल्ह्याचे तापमान हे सर्वाधिक 44.4 ° सेल्सिअसवर गेल्याचे बघायला मिळाले आहे.
Vidarbha Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ (Temperature Rise) झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले आहे. अशातच आज विदर्भातील अकोला (Akola) जिल्ह्याचे तापमान हे सर्वाधिक 44.4° सेल्सिअसवर गेल्याचे बघायला मिळाले आहे. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आज बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्याचे कमाल तापमान 40° सेल्सिअसवर नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काही दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होणार असून विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा
आज अकोला आणि चंद्रपूरमध्ये या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर उर्वरित विदर्भातही उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. असे असले तरी पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश भागात अवकळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. उद्या 6 मे रोजी विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर येथे विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. सोबतच उद्या अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
त्यानंतर 7 मे रोजी देखील विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर येथे विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर हीच स्थिती येत्या 8 मे रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. त्यानंतर मध्य विदर्भात पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
तलावातील चार ते पाच क्विंटल माशांचा दुर्दैवी मृत्यू
सध्याघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यातील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे तलाव आणि धरणांनीही तळ गाठायला सुरवात केली आहे. परिणामी, राज्यात पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अशातच या वाढत्या उन्हाचा फटका मनुष्याप्रमाणेच वन्यजीवांनाही बसताना दिसत आहे. वाशिम शहरातील पदमपुराणात उल्लेख असलेल्या भगवान पदमेश्वर येथील पद्म तलावातील पाणी सुकल्याने चार ते पाच क्विंटल माशाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. गेल्या सात ते आठ दिवसापासून वाढलेले तापमानामुळे तलावातील पाणी आटल्याचे चित्र आहे.
या भागात पावसाचा यलो अलर्ट
सोमवारी विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 6 मे रोजी अकोला, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सोमवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या