Vidarbha Weather Update : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडीचा जोर कसा असणार? काय आहे हवामान विभागाचा अंदाज? वाचा सविस्तर
Vidarbha Weather : विदर्भासह महाराष्ट्रात 4 फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर उद्या, 1 जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Weather Update Today : लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंझावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारतात सध्या असलेल्या धुके आणि बर्फवृष्टी बरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. या प्रभावाने विदर्भासह (Vidarbha) महाराष्ट्रात 4 फेब्रुवारीपर्यंत थंडी (Winter) वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातही दिवस रात्रीचे तापमान सरासरीत किंवा खाली राहण्याचा अंदाज आहे. तर उद्या, 1 जानेवारीला गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
गारव्याची जाणीव राहणार कायम
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळतेय. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात गारठा वाढणार आहे. त्यानंतर तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र थंड हवामान कायम राहील अशी शक्यता देखील हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
25 जानेवारीला नागपूर 8.7 अंशावर गेल्यानंतर तापमान पुन्हा वाढायला लागले. मात्र, त्यानंतर थंड हवेची दिशा बदलल्याने पारा वाढतोय. नागपुरच्या किमान तापमानात आज 2.4 अंशाची वाढ होऊन हे तापमान 16.1 अंशावर पोहोचलं आहे. दिवसाचे तापमानही अंशतः घट होऊन 29.5 अंशावर गेलं आहे. गोंदिया आणि नागपूर वगळता संपूर्ण विदर्भात कमाल तापमान 30 अंशाच्यावर आहे. तर, विदर्भात आज सर्वात कमी किमान तापमान हे 14. 4 अंश वाशिम जिल्ह्याचे नोंदविण्यात आलं आहे. विदर्भात सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या खाली असले तरी त्यात वाढ झाली आहे. तर, आगामी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गारव्याची जाणीव कायम राहणार आहे.
असे आहे विदर्भाचे तापमान
जिल्हे | कमाल | किमान |
अकोला | 31.4 | 16.0 |
अमरावती | 30.8 | 16 .0 |
बुलढाणा | 30.2 | 16.0 |
ब्रम्हपुरी | 31.4 | 17.4 |
चंद्रपूर | 31.0 | 15.8 |
गडचिरोली | 30.4 | 14.8 |
गोंदिया | 29.2 | 15.2 |
नागपूर | 29.5 | 16.1 |
वर्धा | 31.0 | 16.0 |
वाशिम | 32.2 | 14.4 |
यवतमाळ | 32.0 | 15.5 |
देशातील हवामान कसं आहे?
नवी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भागांत धुक्याचा दाट थर पसरला आहे, यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे विमान प्रवास आणि रेल्वे उशिराने सुरु आहेत. बुधवार आणि गुरुवारी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके असण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या डोंगराळ प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या