नागपूरच्या सुभाष नगर भागात तीन वळूंचा धुडगूस, दोन वळू जेरबंद
उपराजधानीतील सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात धुडगूस घालणा-या मन्या आणी दाऊद या दोन वळूंना जेरबंद करण्यात आले आहे. तर याकूब अजून ही मोकाट आहे.
नागपूर : उपराजधानीतील सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात धुडगूस घालणा-या मन्या आणी दाऊदला जेरबंद करण्यात आले आहे. तर याकूब अजून ही मोकाट आहे. लवकरच त्याला जेरबंद केले जाणार आहे. मनपाच्या कोंडवाडा पथकानं काल रात्री ही कारवाई केली आहे.. विशेष म्हणजे मन्या, दाऊद आणि याकूब या वळूच्या दहशतीची बातमी एबीपी माझा ने दाखविली होती. त्यानंतर काल रात्री वळूंना पकडण्याची मोहिम सुरु करण्यात आली.
महापालिकेच्या कोंडवाडा पथकाच्या कर्मचा-यांनी सुभाषनगरमधील धुडगूस घालणा-या वळूंना पकडण्यासाठी ही मोहिम सुरु आहे. सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात दाऊद, याकुब आणि मन्या या तीन वळूंनी प्रचंड धुडगुस घातला होता. त्यांच्यात दहा दिवसांपासून सतत होत असलेल्या युद्धामुळं परिसरातील अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. लहान मुल व वृद्धांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. या वळूंच्या हैदोसामुळे परिसरातील नागरिक धास्तावले होते. मैदान ओस पडली होती. या वळूंचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करत होते.
एबीपी माझाने याबाबतत वृत्त दाखवल्यानंतर महापालिकेला जाग आली. कोंडवाडा विभागाचं पथक या वळूंना जेरबंद करायला पोहचले. दिवसा वाहनांची ये-जा असल्यानं संध्याकाळी साडे आठनंतर या वळूंना पकडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, मन्या आणि दाऊद नावाचे वळू त्यांना सुभाषनगर परिसरातील एका मैदानात गाईंच्या घोळक्यात बसलेले दिसले. वळू मैदानात बसलेले असल्याने मैदानाबाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले.
मनपाचे पथक दाऊदला पकडण्यासाठी सापळा, फास घेऊन मैदानात घुसले. थोड्या वेळाच्या प्रयत्नाने दाऊद जेरबंद झाला. पकडल्यानंतरही बराच वेळ दाऊदचा हैदोस सुरु होता. मात्र मनपा कर्मचा-यांनी मोठ्या शिताफीनं त्याला जिमच्या एका पोलजवळ आणून बांधले. तिथं बांधल्यानंतर 10 मिनिटांनंतर त्याचा प्रतिकार कमी झाला व तो जमिनिवर कोसळला. नंतर कर्मचाऱ्यांनी त्याला गाडीत टाकले आणि कोंडवाड्यात नेले. दाऊदला मनपानं जेरबंद केल्यानं स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रात्री उशीरा मन्या मनपाच्या पथकाला सापडला आणि त्याला ही जेरबंद करण्यात आले. आता मोकाट याकूबला ही मनपा कर्मचारी लवकर पकडतील अशी अशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान दाऊदला पकडून गाडीत टाकून मनपाचे पथक घेऊ न जात असताना मैदानाबाहेर याकूबची स्वारी पोहचली. त्याने गाडीत जेरबंद असलेल्या दाऊदकडे पाहिले. आपला वैरी मनपाच्या हाती लागल्याचे पाहून आणि धोका लक्षात घेऊन त्याने लगेच परिसरातून निघून जाणे पसंत केले.