Forts in Maharashtra: आता गडकिल्ल्यांवर मद्यप्राशन करताना सापडलात तर खबरदार! कठोर कारवाई होणार, राज्य सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत
Sudhir Mungantiwar: भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सर्व गडकिल्ल्यावरील अतिक्रमण हटवले जाईल. मी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून गडकिल्ल्यांसंदर्भात गांभीर्याने काम केले जात आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
नागपूर: आगामी काळात राज्यातील कोणत्याही गडकिल्ल्यांवर व पवित्र स्थळांवर मध्य प्राशन करून येणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी राज्यात कायद्यात सुधारणा केली जाणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. गडकिल्ल्यांवरील वातावरणात एकप्रकारचे चैतन्य असते. अशाठिकाणी आतापर्यंत कोणीही मद्यप्राशन करताना सापडल्यास त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्याच्या कलमाखाली कारवाई होत असे. अशा व्यक्तींना काही रुपयांचा दंड आकारुन सोडले जायचे. मात्र, आता राज्य सरकार कायद्यात बदल करुन गडकिल्ल्यांवर (Forts) मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचलेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते सोमवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक झाल्यासंदर्भात भाष्य केले. भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सर्व गडकिल्ल्यावरील अतिक्रमण हटवले जाईल. मी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून गडकिल्ल्यांसंदर्भात गांभीर्याने काम केले जात आहे. पूर्वी गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी 13 ते 14 कोटी रुपये खर्च व्हायचे. मात्र, यंदा गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवले जाईल. संबंधित व्यक्तींनी सामोपचाराने ऐकले नाही तर कठोर पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
तसेच लंडनच्या वस्तूसंग्रहालयातून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या मुद्द्यावरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले. शिवाजी महाराजांच्या वाघनखांना घेऊन एका इतिहासकाराने विरोध केला आहे. मात्र, त्यामुळे राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत: सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात भाष्य केले. मनोज जरांगे यांनी संवादातून मार्ग काढावा असा सल्ला मुनगंटीवार यांनी जरांगे यांना दिला. देवेंद्र फडणवीस यांचा मराठा आरक्षणाचा विरोध नाही. जरांगे यांना फडणवीसांबद्दल गैरसमज आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
जरांगे पाटील तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी मध्यरात्री 1 वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. पिराची कुरोली या ठिकाणी पालखी मुक्कामी असताना मनोज जरांगे पाटील पोहोचले आणि त्यांनी दर्शन घेतले. यासोबतच ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यात जाऊन मध्यरात्री जरांगे पाटील यांनी माऊली महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मी दिवसा याठिकाणी आल्यास गर्दी होईल आणि वारकऱ्यांना त्रास व्हायला नको म्हणून मी रात्री आलो, असे यावेळी जरांगे पाटील म्हणाले.
आणखी वाचा