आरोपीला किती तासात पकडावे ह्याचे मापदंड असेल तर आणून द्या; नागपूर पोलिसांचे अजब उत्तर
आरोपीला किती वेळात पकडावे याचा मापदंड तुमच्याकडे असेल तर कृपया आम्हाला आणून द्या आम्ही पण त्याचा अभ्यास करू, असे अजब उत्तर नागपूर पोलिसांनी दिलं आहे.दुहेरी हत्याकांडाच्या माथेफिरू आरोपीला जिवंत पकडण्यात अपयशी ठरलेले नागपूर पोलीस पत्रकारांच्या एका प्रश्नावर संतापले.
नागपूर : आरोपीला किती वेळात पकडावे याचा मापदंड तुमच्याकडे असेल तर कृपया आम्हाला आणून द्या आम्ही पण त्याचा अभ्यास करू. दुहेरी हत्याकांडाच्या माथेफिरू आरोपीला जिवंत पकडण्यात अपयशी ठरलेले नागपूर पोलीस पत्रकारांच्या एका प्रश्नावर एवढे संतापले, की आरोपीला किती तासात पकडावे ह्याचे मापदंड आमच्याकडे नाही ते तुम्हीच आणून द्या असे अजब उत्तर पोलिसांनी दिले आहे. "पत्रकारांनी हायपोथेटिकल प्रश्न विचारू नये, जर तरच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देत नाही, असे ही पोलिसांनी बजावले आहे.
नागपुरात दोन दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड घडले होते. कृष्णनगर भागात लक्ष्मीबाई आणि त्यांचा नातू यश यांची त्याच कुटुंबातील तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या माथेफिरू तरुणाने निघृणपणे हत्या केली होती. भर दुपारी घडलेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण नागपूर शहर हादरून गेलं होतं. घटनेनंतर लगेचच हे कृत्य कोणी केले असावे याची माहिती पीडित कुटुंबाने पोलिसांना दिली होती. त्यामुळे नागपूर पोलिसांची अनेक पथकं संबंधित आरोपी तरुणाच्या मागावर होते. घटनेनंतर आरोपी तरुणाने त्याच्या काही मित्रांना फोन करण्यासाठी त्याचा मोबाईल फोन वापरल्यामुळे पोलिसांना तांत्रिक पुरावे मिळून आरोपी शहरातील कोणत्या भागात आहे याची माहितीही मिळत होती.
नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या
मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस भयावह हत्याकांड करून मोकाट फिरणाऱ्या त्या आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले. रात्री उशिरा आरोपीने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. आरोपीने आत्महत्या केल्यामुळे या हत्याकांडाचे आणि त्यामागच्या पार्श्वभूमीचे अनेक रहस्यही त्याच्यासोबत नाहीसे झाले होते.
नागपूर पोलिसांनी दोन वेगळ्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परीषद बोलावली असता पत्रकारांनी दुहेरी हत्याकांड आणि आरोपीच्या आत्महत्येबद्दल प्रश्न विचारले. हत्याकांडाच्या अनेक तासानंतरही पोलीस आरोपीला जिवंत पकडू शकले नाहीत, हे पोलिसांचे अपयश नाही का? असे प्रश्न नागपूर पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना विचारण्यात आले. त्यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी दिलेले उत्तर अनाकलनीय म्हणावे लागेल. "आरोपीला किती वेळात पकडावे याचा मापदंड असेल तर कृपया आम्हाला आणून द्या आम्ही पण त्याचा अभ्यास करू", "आरोपीला किती तासात पकडावे ह्याचे मापदंड आमच्याकडे नाही ते तुम्हीच आणून द्या" असे फुलारी म्हणाले. पोलीस दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीला जिवंत पकडू शकले नाही हे आमचे अपयश मानत नाही" असेही सुनील फुलारी म्हणाले. "पत्रकारांनी हायपोथेटिकल प्रश्न विचारू नये, जर तरच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देत नाही असेही फुलारी म्हणाले.
एकतर्फी प्रेम प्रकरणात माथेफिरू तरुणाकडून तरुणीच्या आजी आणि भावाची हत्या, तरुणीची प्रतिक्रिया