(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सोशल मीडिया उत्तमच, पण जरा जपून; 'समाज माध्यमातील अभिव्यक्ती - एक उलट तपासणी'मध्ये तज्ज्ञांचे मत
कितीही दडपशाही असली तरी सोशल मिडियावर लोकशाही जिवंत असते. मात्र, हे वापरताना आपण सजग आहोत का, असा प्रश्न स्वतःलाच विचारण्याचे आवाहन प्रशांत देशमुख यांनी केले.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सोशल मीडिया हे अतिशय लोकतांत्रिक माध्यम असले तरी ते अतिशय अनियंत्रित आहे. त्यामुळे, सोशल मीडिया उत्तम असले तरी त्याचा वापर जपून केला जावा, अशी भावना ज्येष्ठ सोशल ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी 'समाज अभिव्यक्ती अभिव्यक्ती : एक उलट तपासणी' या सत्रात व्यक्त केली. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी मनोहर म्हैसाळकर दालनात पार पडलेल्या या सत्रात अध्यक्षस्थानाहून बोलत होते. या सत्रात पत्रकार रमेश कुलकर्णी, प्रशांत देशमुख, संदीप भारंबे, नितीन नायगावकर सहभागी झाले होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. सोशल मिडियावर आपणच लिहितो, वाचतो, लाईक करतो, शेअर करतो आणि कमेंटेही आपणच करतो. त्यामुळे आपणच आपली उलट तपासणी करण्याचे अधिकारही आपलेच असल्याचे शैलेश पांडे म्हणाले.
दडपशाही असली तरी सोशल मिडियावर लोकशाही जिवंत
अभिव्यक्ती हा विषय प्रत्येक सजिवाच्या जन्मापासून चिकटते. त्यामुळे सगळ्याच माध्यमांसाठी अभिव्यक्ती सारखीच आहे. सोशल मिडिया सहज उपलब्ध होणारे माध्यम आल्याने त्याचा आपण सगळ्यांनी सहजपणे स्वीकार केला आहे. त्यामुळे, एखादा विचार एखाद्याला आवडतो तर एखाद्याला आवडत नाही आणि त्याचा सन्मान करावा आणि आपली विवेकबुद्धी जागृत ठेवावी असे संदीप भारंबे यावेळी म्हणाले. समाज माध्यम हे मानवी स्वभावावर स्टॅण्ड झालेले माध्यम आहे. आता शिक्षणाऐवजी सोशल मीडिया हेच समाजपरिवर्तनाचे माध्यम म्हटले जाते. कितीही दडपशाही असली तरी सोशल मीडियावर लोकशाही जिवंत असते. मात्र, हे वापरताना आपण सजग आहोत का, असा प्रश्न स्वतःलाच विचारण्याचे आवाहन प्रशांत देशमुख यांनी केले.
वाढलेल्या स्कीन टाईममुळे टेंशन
सोशल मीडियावरील स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणताना माणसातील माणुसकी हरवली आहे. आरोग्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आहे. तेव्हा, सोशल मिडीयाची उलट तपासणी करताना त्याची सुरुवात आपणापासूनच होते, अशी भावना रमेश कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. सोशल मीडियाची उलट तपासणी करण्याची कुठलीच यंत्रणा सध्या तरी अपलब्ध नाही. मात्र, समाज माध्यमाने जो बोलत नव्हता त्याला शब्द दिले आणि जो बोलत होता त्याला शांत केले. असा परस्पर विरोधाभास सोशल मीडियाने निर्माण केल्याचे मत नितीन नायगावकर यांनी व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार डॉ. कल्पना मकरंदे यांनी मानले.