Shyam Manav : अनिसच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरणाचे प्रयत्न ; धमकीसत्र सुरुच
राज्यभरातून अनिसच्या कार्यकर्त्यांना फोनद्वारे अश्लिल शिवीगाळ सुरु आहे. तसेच पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यात येत आहे. मात्र तरी आम्ही घाबरणार नसल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
Bageshwar Baba Shyam Manav controversy : बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Baba) यांना दिव्यशक्ती दाखविण्याचे चॅलेंज दिले होते. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांचे फोनवर धमक्या देऊन, तसेच सोशल मीडियावर बदनामी करुन खच्चीकरणाचे प्रयत्न सुरु असल्याची बाब समोर आली आहे. मात्र आपण रोज धमकी देण्यासाठी येणाऱ्या फोनवर त्यांचे प्रबोधन करत असून आपण कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून धर्माच्या नावावर सुरु असलेल्या बुवाबाजी विरोधात असल्याचे अनिसचे हरिश देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
पुढे देशमुख म्हणाले, 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंदू धर्माच्या विरोधी असल्याची अफवा पसरवून लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम करण्यात येत आहे. त्यातून चिडलेले नागरिक आम्हाला आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनद्वारे अश्लील शिवीगाळ करत आहेत. तसेच आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यात येत आहे. मात्र तरी आम्ही सर्व संयमाने सर्वांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असून या धमक्यांमुळे आम्ही घाबरणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले'.
श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ...
श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची आणि नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणे गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील तरूणाला अटक केल्यानंतर श्माम मानव यांच्या सुरक्षेत नागपूर पोलिसांनी वाढ केलीय. श्याम मानव यांना धमकी दिल्यानंतर बंदुकीसह पुण्यातील एक संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या तरूणाच्या अटकेनंतर नागपूर पोलिसांनी अधिक खबरदारी घेतली असून पुण्यात श्याम मानव यांचा मुलगा राहत असलेल्या ठिकाणी देखील सुरक्षा वाढवली आहे.
'ब्रेन वॉश' केलेल्या तरुणांचा वापर...
धमक्या आल्यानंतर याबाबत श्याम मानव यांना विचारले असता ते म्हणाले, 'मला भीती वाटत नाही, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या झाल्यानंतर मी लगेच यामागे कोण आहे, हे कोणी केले आहे हे सर्व सांगितले होते. जे तरुण यामागे आहत ते सर्व ब्रेन वॉश केलेले तरुण असून यापूर्वीच्या चारही हत्या प्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासून माहिती होती. मात्र पुरावे मिळत नव्हते. दोन दिवसांपूर्वी पुण्यात पकडली गेलेली व्यक्ती कोण आहे यासंदर्भात फारशी माहिती नाही. तो त्याच संघटनांच्या वर्तुळातला आहे की बाहेरचा आहे हे अजून स्पष्ट नाही. मात्र, हे अतिशय नियोजित पद्धतीने रचलेला कट असून त्यांना महाराष्ट्रात कोणीही पुरोगामी विचाराचा नसावा असे वाटत आहे. त्यामुळे जी मुलं हिंदू धर्मावर प्रेम करतात त्यांचा ब्रेन वॉश केला जातो.
त्यामुळे जे जे हिंदू धर्मात सुधारणांबद्दल काही करतात ते सर्व हिंदू धर्म विरोधी आहेत, ते सैतान आहेत असे त्यांच्या डोक्यात भरवले जाते. एका प्रकारे त्यांना प्रोग्राम केलं जातं. पुण्यात पकडला गेलेला माणूस त्याच यंत्रणेतून तयार झालेला आहे का? तो ब्रेनवॉश केलेला आहे का? त्याबद्दल पोलिस शोध घेतील आणि सत्य समोर आणतील. या सर्वा मागे सनातन प्रभात सारखे लोक असू शकतात, अशी शंका श्याम मानव यांनी व्यक्त केली आहे.
ही बातमी देखील वाचा...