Adulterated Oil | ब्रॅण्डेड तेलाच्या डब्ब्यात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री, नागपूरमध्ये FDA च्या कारवाईनंतर गौडबंगाल उघड
ब्रॅण्डेड तेलाच्या डब्यात भेसळयुक्त तेल विकत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अन्न व औषध विभागाने इतवारी परिसरातील काही व्यावसायिकांकडे छापा मारल्यानंतर 3 लाख 72 हजारांचे किमतीचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केलं आहे.
नागपूर : ब्रॅण्डेड तेलाच्या डब्ब्यात भेसळयुक्त तेल भरुन ते बाजारात विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रसानाच्या कारवाईनंतर हा गौडबंगाल समोर आला आहे. डॉक्टरांच्या मते हे भेसळयुक्त तेल ग्राहकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम करु शकतं. भेसळयुक्त तेलामुळे कमी काळात अॅलर्जी तसंच पोटाचे विकार जडू शकतात. तर दीर्घकाळ भेसळयुक्त तेलाचं सेवन केल्यास एखाद्याला कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो.
अनेकदा ब्रॅण्डेड तेल खरेदी करताना आरोग्यवर्धक तेलाचा वापर करत असल्याचं आपल्याला वाटतं. मात्र, काही वेळा ब्रॅण्डेड तेलाच्या डब्यावर किंवा पाकिटावर फक्त मोठ्या ब्रॅण्डचे नाव असते, मात्र आतील तेल भेसळयुक्त असू शकतं. अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूरच्या इतवारी परिसरात काल (11 फेब्रुवारी) मारलेल्या छाप्यात हीच बाब समोर आली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने इतवारी परिसरातील काही व्यावसायिकांकडे छापा मारला. यावेळी तिथे नावाजलेल्या कंपन्यांचे लेबल लागलेल्या डब्यांमध्ये भेसळयुक्त तेल भरले जात असल्याचं समोर आलं. एफडीएच्या पथकाने तिथून 3 लाख 72 हजार रुपयांचे भेसळयुक्त तेल आणि इतर साहित्य जप्त केले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार परिसरातील पाच व्यापाऱ्यांकडे सुरु असल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान, भेसळयुक्त तेल अनेक अर्थाने शरीरासाठी घातक असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांवर अशा भेसळयुक्त तेलाचा जास्त परिणाम होऊ शकतो. अल्प कालावधीत भेसळयुक्त तेलामुळे त्वचेवर अॅलर्जी येणं, पुरळ येण्यासारखे प्रकार होतात. त्याशिवाय लहान मुलांना तसंच वयोवृद्धांना हमखास पोटाचे विकार होतात. मात्र, दीर्घ कालावधीत भेसळयुक्त तेल लिव्हरवर दुष्परिणाम करतं. कावीळ होऊ शकते. तसंच अनेक प्रकारच्या कॅन्सरचं कारण भेसळयुक्त तेल असल्याचंही समोर आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे भेसळयुक्त तेलाचे जास्त दिवस केलेलं सेवन दीर्घकाळात तुम्हाला मृत्यूच्या दारापर्यंत नेऊ शकतं.
दरम्यान, भेसळयुक्त तेल ओळखणं हे खूप कठीण नाही. सामान्यपणे प्रत्येक तेलाला काही खास प्रकारचा वास असतो. काही तेलाचा वास उग्रही असतो. तेल चांगलं आहे की नाही याची सर्वात प्राथमिक चाचणी म्हणजे तेलाला त्याचा आवश्यक वास आहे की नाही ते पाहावं. जर तेलात भेसळ असेल तर त्याचा वास कमी असतो, हवा तेवढा उग्र नसतो. त्याशिवाय तेल फ्रिजमध्ये ठेवल्यास जर काही वेळाने ते थोडं गोठलं आणि त्यावर हलका पांढरा थर येत असेल तर ते तेल भेसळयुक्त आहे असे समजावे.
नागपुरात ज्या इतवारीच्या बाजारपेठेत एफडीएच्या पथकाने धाड टाकून ब्रँडेड तेलाच्या डब्ब्यात भेसळयुक्त तेलाच्या विक्रीचा हे रॅकेट उघडकीस आणलं आहे, त्या इतवारी बाजारपेठेतून सामान्य नागपूरकरच नव्हे तर नागपूरच्या अवतीभवतीचे अनेक छोटे किराणा व्यापारीही तेलाची खरेदी करुन पुढे किरकोळ स्वरुपात त्या तेलाची विक्री करतात. त्यामुळे एफडीएने या कारवाईनंतर इतरत्रही तपासणी करण्याची आणि भेसळीचा हा व्यवसाय समूळपणे नष्ट करण्याची गरज असल्याचं नागपूरकरांचं म्हणणं आहे.