ज्या क्षणासाठी विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो, तो आजचा दिन परमभाग्याचा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
ज्या क्षणासाठी विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो. असा क्षण आज याची देही, याची डोळा बघणं, म्हणजे मला असं वाटतं हा श्रीरामाचा आशीर्वाद आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya: अयोध्येतील (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही अवधी उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) सत्यात अवतरलं आहे. ज्या क्षणाकरिता प्रदीर्घ संघर्ष केला. ज्या क्षणासाठी विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो. गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, ज्या क्षणासाठी आतुरतेने वाट पाहिली, असा क्षण आज 'याची देही, याची डोळा बघणं' म्हणजे मला असं वाटतं हा श्रीरामाचा आशीर्वाद आहे. माझ्याकरता हा क्षण अतिशय भावनिक आणि परमभाग्याचा क्षण असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
आज नागपुरातील महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिरात प्रसिद्धी शेफ विष्णू मनोहर (Vishnu Manohar) यांनी रामजन्म स्थानावर रामललाच्या आगमन सोहळ्या निमित्ताने सहा हजार किलो हलवा तयार करण्याचा संकल्प केला आहे. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारताची नवी अस्मिता आजपासून सुरू
अयोध्येतील राम मंदिरासाठी त्यावळी आमचा नारा होता 'रामलला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे. त्यानंतर 6 डिसेंबर 1992 त्या ठिकाणचा जो ढाचा होता, तो खाली आला आणि मंदिर तेथेच तयार झालं. त्यानंतर आमचा नारा होता 'रामलला हम आयेंगे, मंदिर भव्य बनायेंगे' मात्र आम्हाला जायची गरज पडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं. आज त्या मंदिरात प्रभूश्री रामांची प्राणप्रतिष्ठा होते आहे. हा सोहळा केवळ कार सेवकांसाठी नाही, तर कोट्यावधी हिंदू बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सोबतच अमृत महोत्सवी भारताची नवी अस्मिता ही आजपासून सुरू होत असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची अतिशय उत्कंठा
उद्धव ठाकरे आज अयोध्येला न जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजन करणार आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना केला असता ते म्हणाले, आज मला कोणावरही टीका करायची नाही. आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. राम मंदिर बनत असताना मी ते मंदिर जाऊन बघितले आहे. मला देखील दर्शनाची अतिशय उत्कंठा आहे. आता रामलालची मूर्ती स्थापन झाल्यानंतर दर्शनाची अगदी मनापासून ओढ आहे. मला माहिती आहे फेब्रुवारीमध्ये ती ओढ पूर्ण होईल, असे देखील फडणवीस म्हणाले.
कोराडी मंदिरामध्ये सहा हजार किलो हलवा तयार
कोराडीच्या ऐतिहासिक मंदिरामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज राम जन्म स्थानावर रामललाच्या आगमनाच्या निमित्ताने सहा हजार किलो प्रसाद हलवा तयार करण्याचे काम हाती घेतलंय. त्याकरिता जगातली सर्वात मोठी कढई, ज्याला हनुमान कढई असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये सहा हजार किलो हलवा तयार करण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये मटेरियल सात हजार किलो टाकण्यात आले आहे. त्यामुळे हा हलवा सगळे रेकॉर्ड मोडणारा हलवा असणार आहे. आज इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढई अयोध्येला देखील जाणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्या मध्ये देखील नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी होणार आहे. देशभरात आज एक उत्सव पाहायला मिळतो आहे. हा जो उत्साह आहे, हा अतिशय महत्वाचा असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :