Rajya Sabha Election : संभाजीराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न, राज्यसभेच्या उमेदवारीवरुन फडणवीस यांचा पवारांवर निशाणा
Rajya Sabha Election : संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शरद पवार यांनी सुरु केला असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजेंच्या कोंडीसाठी शरद पवार यांना जबाबदार धरलं आहे.
नागपूर : "राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे", या शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. संभाजीराजे यांच्या उमेदवारीचा विषय शरद पवार यांनी सुरु केला असं म्हणत त्यांनी संभाजीराजेंच्या कोंडीसाठी शरद पवार यांना जबाबदार धरलं आहे.
ज्याप्रकारे सर्वात आधी शरद पवारांनी हा विषय सुरु केला आणि नंतर ज्या दिशेने हा सर्व विषय गेला... ते पाहून मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा हा सर्व विषय झालेला आहे. मला असं वाटतं की त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. मात्र हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेना जे नाव देईल, त्याला आमचा पाठिंबा : शरद पवार
राज्यसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकच जागा आहे. ही जागा निर्वाचित करण्यासाठी आवश्यक नंबर आमच्याकडे आहे. एक जागा निवडून देऊनही काही मते शिल्लक आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी सुद्धा एकच जागा मिळत होती. मात्र मी मुख्यमंत्र्यांना दोन जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी विनंती केली. तेव्हा मी व फौजिया खान दोघांच्या जागा होत्या. त्यामुळे शिवसेनेने त्यावेळी माघार घेतली. मात्र पुढच्यावेळी दुसरी जागा ही शिवसेनेला द्यावी ही मागणी त्यांनी केली ती आम्ही मान्य केली. त्यामुळे एक जागा लढवून उर्वरित मतही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कोणालाही देऊ शकत नाही. शिवसेना जे नाव देईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असं शरद पवार यांनी म्हटलं.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल : संजय राऊत
शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचं नाव फायनल झालं आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. "संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. त्यांनी पक्षासाठी आतापर्यंत खूप काम केलं आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे," असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची मागणी संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाली होती. छत्रपती शिवरायांच्या वारसाला पाठिंबा द्या, असं संभाजीराजेंनी म्हटलं होतं. परंतु राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजे यांना शिवसेना प्रवेशाची अट घालण्यात आली. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला.
संभाजीराजे यांची राजकीय कारकीर्द
- रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातून संभाजीराजे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली
- 2009 साली लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी, या निवडणुकीत संभाजीराजे यांचा पराभव झाला
- 2016 मध्ये भाजपचे राज्यसभा खासदार म्हणून संभाजीराजे यांची वर्णी लागली
- गेली दहा वर्षे संभाजीराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्त्व करत राज्यभर दौरे केले
- मराठा आरक्षणावरुन त्यांनी राज्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला.
- राज्यसभेवर मराठा उमेदवार जावा, अशी मराठा समाजाची धारणा झाली