Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
शिवसेना शिंदे गटाचे कोणतेही उमेदवार फुटू नयेत किंवा माघार घेऊ नये यासाठी आता उमेदवारांनाच अज्ञातस्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ विरुद्ध प्रकाश आबिटकर असा सामना रंगणार आहे.

Kagal Nagar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेली कागल नगरपालिकेची चुरस दिवसागणिक वाढतच चालली आहे. पहिल्यांदा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे राजकीय वैर विसरुन एकत्र आल्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. या दोघांच्या एकत्र येण्याने शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक मात्र एकाकी पडले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या मदतीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उतरले आहेत. त्यामुळे कागलच्या निवडणुकीत भलताच रंग चढला आहे. शिवसेना शिंदे गटाचे कोणतेही उमेदवार फुटू नयेत किंवा माघार घेऊ नये यासाठी आता उमेदवारांनाच अज्ञातस्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे आता कागल नगरपालिकेच्या निमित्ताने हसन मुश्रीफ विरुद्ध प्रकाश आबिटकर असा सामना रंगणार आहे. आता अर्ज माघारीची मुदत संपून गेल्यानंतरच उमेदवार कागलमध्ये दिसणार आहेत.
नगरपालिकेसाठी दोन कॅबिनेट मंत्रीच एकमेकांविरोधात
यापूर्वी, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आता कागल नगरपरिषदेच्या माध्यमातून हे दोन्ही नेते एकमेकांसोबत उभे ठाकणार आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलच शीतयुद्ध रंगलं आहे. महायुती सत्तेत आल्यानंतर प्रकाश आबिटकर कोल्हापूरचे पालकमंत्री झाले. त्यापूर्वी पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुश्रीफ यांच्याकडे होती. तेव्हापासून या नेत्यांमध्ये राजकीय शीतयुद्ध संधी मिळेल तेव्हा सुरूच आहे. त्यामुळे आता हसन मुश्रीफ आणि समरजित यांची युती झाल्याने संजय मंडलिक यांच्यासाठी आता प्रकाश आबिटकर यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे नगरपालिकेसाठी दोन कॅबिनेट मंत्रीच एकमेकांविरोधात आल्याने राज्यातील हे दुर्मिळ उदाहरण आहे असं म्हणावं लागेल. कागलमध्ये एक उमेदवार सुद्धा बिनविरोध करण्यात हसन मुश्रीफ यांना यश आलं आहे. प्रभाग क्रमांक नऊमधून त्यांची सुनबाई बिनविरोध निवडून आली. त्यामुळे शिंदे गटाच्या इतर उमेदवारांना धक्का लागू नये आणि निवडणुकीतील रंगत कायम राहावी यासाठी आता प्रकाश आबिटकर यांनीच पुढाकार घेत उमेदवार अज्ञातस्थळी नेले आहेत.
कागल तालुक्यामध्ये मंडलिक गटाची निर्णायक ताकद
दुसरीकडे मुश्रीफ आणि घाटगे यांची झालेली युती सुद्धा कार्यकर्त्यांना पचनी पडलेली नाही. काही कार्यकर्त्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून सुद्धा दाखवली आहे. ज्यांच्यासाठी डोकी फोडून घेतली ते एकत्र आले आहेत तर आमची किंमत काय अशी विचारणा सुद्धा होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजीचा लाभ शिवसेना शिंदे गटाकडून घेतला जातो का? याकडेही लक्ष असेल. कागल तालुक्यामध्ये मंडलिक गटाची निर्णायक ताकद आहे. त्यामुळे घाटगे आणि मुश्रीफ यांच्या युतीला या ताकदीच्या माध्यमातून आव्हान दिलं जाणार का? हा सुद्धा राजकीय चर्चेचा विषय आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























