Prof. G. N. Saibaba: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात साईबाबा निर्दोष; मुंबई हायकोर्टाचा निर्णय
G. N. Saibaba: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातून जी.एन. साईबाबा यांची नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. साईबाबा आणि इतरांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.
G. N. Saibaba: माओवाद्यांशी संबंध आणि त्यांच्या कारवायांमध्ये मदत केल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा (Prof. G.N. Saibaba) यांची मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला. साईबाबा यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर साईबाबा आणि इतर आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते.
न्या. रोहित देव आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना आरोपींची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ष 2017 मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात साईबाबा यांनी हायकोर्टात धाव घेतली. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात साईबाबा यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. साईबाबा हे 90 टक्के दिव्यांग असून व्हिलचेअरवर असतात. सध्या ते नागपूर मध्यवर्ती तुरुंगात आहेत.
मार्च 2017 मध्ये गडचिरोली कोर्टाने साईबाबा यांच्यासह एक पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांसह अन्य एकाला माओवाद्यांशी संबंध आणि देशाविरोधात युद्ध पुकारण्याच्या कटात सामिल असल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. सप्टेंबर 2022 पासून त्या याचिकेवर नियमित सुनावणी झाली. 29 सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण होऊन खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर हायकोर्टाने आज निकाल सुनावला. साईबाबा यांच्यासह अन्य पाच आरोपीही दोषमुक्त असल्याचे सांगत सर्वांची तातडीने सुटका करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. तुरुंगात असलेल्या पाच पैकी एका आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असताना आजाराने मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?
जी. एन. साईबाबा दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक होते. वर्ष 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदाअक्काला भेटायला आलेल्या काहीजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबा हा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर गडचिरोली मध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबाच्या घरात झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे गोळा केले होते. त्यानंतर साईबाबाला अटक केली होती.
साईबाबाच्या घरातून मिळालेले साहित्य आणि डिजिटल पुरावांच्या आधारे पोलिसांनी साईबाबा जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचे काम करत असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. एवढेच नाही तर तो परदेशामध्येही नक्षलवाद्यांसाठी सहानुभूती आणि समर्थक जोडण्याचे काम करत असल्याचे पोलिसांचे आरोप होते. साईबाबा विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.