
Nagpur : पक्ष वाढवायचा की मोदींचे भूत उतरवायचं हे ठरवा आणि एकत्र या, अन्यथा आम्ही एकटे लढू; प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला इशारा
VBA Prakash Ambedkar : आम्हाला जर कुणी सोबत घेतले नाही तर आम्ही लढू आणि जिंकूही असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नागपूर: मोदी नावाचे भूत उतरवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील पण एकीने लढलं पाहिजे असं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केलं आहे. ते नागपुरात बोलत होते. प्रकाश आंबेडकर हे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये जाण्यास उत्सुक असून अद्याप त्याचा निर्णय झाला नाही.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी 'अॅक्टिव्ह मोड' वर आली असून ठिकठिकाणी सभा, मेळावे घेण्याचे काम सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात सोमवारी झालेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडत भाषण केलं.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीला कुठल्या पक्षाने सोबत घेतले तर ठीकच अन्यथा, एकटा चलो रे चा नारा देत कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे देखील सांगितले. त्या 56 इंच छातीमध्ये केवळ गाठी आणि फाफडा आहे. मात्र तुम्ही आमच्या सोबत आलात तर आम्ही आमचे डोकं तुम्हाला देऊ.
यावेळी संघावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण आज ज्या नागपुरात आहोत, त्यांच नागपुरात 50 वर्षाआधी आम्ही संविधान मनात नाही, संधी मिळताच आम्ही हे संविधान उलथून लावल्याशिवाय राहणार नाही असे बोलले गेले आहे. नागपुरात पार पडलेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेच्या मांचावरून प्रकाश आंबेडकर बोलत होते.
पक्ष वाढवायचा आहे, की मोदींना घालवायचं आहे हे ठरवा- प्रकाश आंबेडकर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीतील इतर पक्ष असतील त्यांना आम्ही मदत करायला निघालो आहोत. हे प्रतीक्रांतीचे भूत नागपूरातून निघाले आहे. त्याला गाडायला आम्ही निघालो आहे. मात्र दुर्दैवाने ते मलाचा गाडायला निघाले आहे अशी आजची परिस्थिती आहे. मात्र उद्या काय होईल ते सांगता येत नाही. कोणी 30 जागा लढवणार, कोणी 23 जागा लढवणार, असे बोलले जात आहे. मात्र कुणीही जागा सोडायला तयार नाही. त्यांना मी म्हणेन की आधी बसलेले मोदीचे भूत उतरवा. आता तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे, की मोदींना घालवायचं आहे हे ठरवा. मोदींना घालवायचं असेल तर दोन तीन जागा कमी आल्या तरी हरकत नाही. मात्र मोदी नावाचे भूत एकदा का तुमच्या बोकांडी बसले तर मग तुम्ही तिहारच्या तुरूंगात गेल्या शिवाय राहणार नाही अशी उपहासात्मक टीका देखील प्रकाश आंबेडकरांनी केली.
आपल्या विचरांचे वर्चस्व, तोपर्यंत आपली क्रांती यशस्वी
विषमता, गुलामी, अन्याय अत्याचार हवा असेल तर मग विभक्तपणा हा त्याचा आधार आहे. विभक्तपणा आला तर आपण एकमेकांना कमी लेखतो. ही क्रांती आपण सुरू केली ती मानवतेची क्रांती आहे. विभक्त विरुद्ध एकता प्रस्थापित करण्यासाठी आहे. विभक्तपणामध्येच या देशाची गुलामी आहे. देशातील आताचा लढा हाच आहे असे मी मानतो. मनुस्मृती लागू झाली ती मंदिरातून लागू झाली. मात्र तिच्या जागी जो नवा कायदा आला तो संविधानाच्या रूपाने. हा कुठल्या मंदिरातून आला नाही, तर तो या देशाच्या संसदेतून आले आहे, संविधान सभेतून आला. सत्तेचे केंद्र आज मंदिर नसून संसद आहे. शिवाजी महाराज राजे होते. मात्र धर्माने मान्यता नव्हती, म्हणून गागाभटांनी शिवराज्याभिषेक करून त्यांना मान्यता दिली. धर्म त्यावेळी मान्यता देता होता. त्यावेळी सेंटर ऑफ पॉवर हा धर्म होता. मात्र आताची सेंटर ऑफ पॉवर हा धर्म, मंदिर, देवळे नाही तर संसद आहे. संसदेवर ज्याचा ताबा आज त्याची व्यवस्था. त्यामुळे संसद आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे. ज्या दिवशी या विचारांचा पराभव होईल त्या दिवशी आपली देखील हार आहे असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
