Nagpur Sports : राष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस स्पर्धा बुधवारी, देशभरातील पावणे दोनशे खेळाडू होणार सहभागी
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर येत्या 2 ते 9 नोव्हेंबरदरम्यान झेक प्रजासत्ताक येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ निवडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नागपूर : फेडरेशन ऑफ इंडिया फॉर स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस (फिसाफ इंडिया)च्या वतीने व उन्नती ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित चौथी राष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस चॅम्पियनशिप उद्या, बुधवारी सिव्हिल लाइन्स येथील दक्षिणमध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील पावणे दोनशे खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती, उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैयक्तिक व सांघिक या दोन गटात होणारी ही स्पर्धा टायनी, मिनी, कॅडेट, ज्युनिअर, सिनियर व मास्टर्स अशा एकूण सहा प्रकारांमध्ये खेळली जाणार आहे. स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांतील जवळपास पावणे दोनशे युवा खेळाडू सहभागी होत आहेत. नागपूरचे डझनभर खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सर्व खेळाडू व अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण, रौप्य व ब्रॉंझपदक दिले जाणार आहे. स्पर्धेचे उदघाटन माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे. त्यानंतर लगेच सामने सुरू होतील. सायंकाळी अंतिम सामने व पुरस्कार वितरण होणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर येत्या 2 ते 9 नोव्हेंबरदरम्यान झेक प्रजासत्ताक येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ निवडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला फिसाफ इंडियाचे अध्यक्ष परेश गांधी, तांत्रिक संचालक प्रणव गांधी, सुमन सोनी, मोहिनी ताटते व अश्विनी तारुरवार उपस्थित होते.
Smart India Hackathon: गुरुवारपासून स्मार्ट इंडिया हॅकाथॉन, 8 राज्यातून 27 संघ होणार सहभागी
17 वर्षे वयोगटासाठी हॉकी स्पर्धा
नागपूर : मेजर ज्ञानचंद यांचे स्मृती प्रित्यर्थ तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनी 29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा हॉकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 17 वर्षा खालील मुले व मुलींसाठी असून स्पर्धा पत्रकार निवासा जवळील विदर्भ हॉकी संघटनेच्या क्रीडांगणात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला सकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज 26 ऑगस्ट 2022 पर्यंत सकाळी 6.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे सादर करावे. जिल्ह्यातील हॉकी खेळाच्या 17 वर्षे वयोगटातील संघ, खेळाडू विद्यार्थीनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक यांनी केले आहे.