Nagpur Weather Update : नागपूर 8.5 तर गोंदिया 7अंशांवर, विदर्भात आजही यलो अलर्ट
नागपुरात 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nagpur Weather News : नागपुरकरांनी रविवारी या मोसमातील गारठलेली रात्र अनुभवल्यानंतर सोमवारी तापमानात किंचित वाढ झाली. मात्र शितलहरीचा प्रभाव संपूर्ण विदर्भात कायम होता. सोमवारी उपराजधानीत 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, तर गोंदिया येथे लागोपाठ तिसऱ्या दिवशी विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्यामुळे थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे सध्या मध्य भारतात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र या भागांत दिसून येत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा दहा अंशांच्या खाली किंवा आसपास आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी नागपूरच्या तापमानात अर्ध्या अंशाची वाढ झाली. मात्र बोचरे वारे व हवेत गारठा कायम होता. गोंदियावासीही तीन-चार दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने त्रस्त आहेत. सोमवारी नोंद झालेले 7 अंश सेल्सिअस तापमान विदर्भात सर्वात कमी, तर जळगाव (5 अंश सेल्सिअस) व औरंगाबाद (5.7 अंश सेल्सिअस) नंतर राज्यात तिसरे नीचांकी तापमान होते.
विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जिल्हा : तापमान
- गोंदिया - 7.0
- नागपूर - 8.5
- यवतमाळ - 8.5
- वर्धा - 9.9
- अमरावती - 9.9
- गडचिरोली - 9.6
- चंद्रपूर - 10.0
- ब्रह्मपुरी - 10.4
- अकोला - 10.4
- बुलडाणा - 10.4
राज्यातही पारा पुन्हा घसरणार
राज्यातील काही भागात थंडीमुळे हुडहुडी भरलेली असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी पडली आहे. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठला आहे. राजधानी दिल्लीत थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. किमान तापमान 5 अंशांवर गेले असून दृश्यमान्यता (Visibility) 50 मीटरपेक्षाही कमी आहे. पुढील दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यात वाढणार थंडीचा जोर
औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भतील काही भागात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची लाट येऊ शकते. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
ही बातमी देखील वाचा..