Nagpur News : दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर पोलिसांची दत्तक योजना, गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे तपास अधिकाऱ्यासह डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक
Nagpur News : नागपूर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांचे आरोपी हमखास शिक्षेपर्यंत पोहोचतील, यासाठी खास 'दत्तक योजना' राबवणे सुरु केली आहे. यासाठी तपासी अधिकाऱ्यांसह DCP स्तराच्या पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे दत्तक दिली जात आहेत.
Nagpur News : गुन्हा घडल्यावर तपास करुन आरोपीला अटक करणे, त्याच्या विरोधातले पुरावे गोळा करुन ते न्यायालयात सादर करणे ही पोलिसांची जबाबदारी असते. मात्र, नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) गंभीर गुन्ह्यांचे आरोपी हमखास शिक्षेपर्यंत पोहोचतील, यासाठी खास "दत्तक योजना" राबवणे सुरु केली आहे. त्याअंतर्गत हत्या, बलात्कार, छेडछाड आणि विनयभंग सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना हमखास शिक्षा व्हावी यासाठी तपास अधिकाऱ्यांसह (Investigating Officer) पोलीस उपायुक्त स्तराच्या पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे दत्तक दिली जात आहेत. तपास अधिकाऱ्याने नीट आणि वेळेत दाखल केले आहे की नाही यावर DCP दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रकरणात दोषारोपपत्र लक्ष ठेवायचेच आहे. शिवाय दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत त्याच्याशी संबंधित सर्व पुरावे भक्कमपणे सादर झाले की नाहीत, सरकारी वकील योग्य पद्धतीने ते पुरावे न्यायालयासमोर मांडत आहेत की नाही यावर ही लक्ष ठेवायचे आहे. या दत्तक योजनेचा उद्दिष्ट म्हणजे गंभीर गुन्ह्यांचे आरोपी दोषी सिद्ध होऊन त्यांना कठोर शिक्षा होईल असा आहे. या दत्तक योजनेत सध्या बलात्काराची 38 आणि हत्येची 42 प्रकरणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आली आहेत.
गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक का?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नागपूर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांचे प्रकरणे तपास अधिकाऱ्याकडे असताना ते डीसीपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दत्तक का दिले? तर त्याचे कारण मागील दोन वर्षात नागपुरात गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी सिद्ध होऊन शिक्षेपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले होते आणि त्यामुळेच गंभीर गुन्ह्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या उद्देशाने ही दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे.
नागपुरात गेल्या दोन वर्षात गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण
- 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत बलात्काराच्या 67 प्रकरणांमध्ये न्यायालयाने निर्णय दिले. मात्र फक्त 12 प्रकरणात आरोपी दोषी सिद्ध झाले. तर 55 प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले.
- म्हणजेच बलात्काराच्या प्रकरणात दोष सिद्धीचे प्रमाण 18 टक्के राहिले
- याच कालावधीत हत्येच्या 34 प्रकरणात न्यायालयाने निकाल सुनावले. त्यापैकी फक्त 6 आरोपी दोषी ठरले. 28 प्रकरणातील आरोपी मोकाट सुटले.
- म्हणजेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण फक्त 18 टक्के होते.
- विनयभंगाच्या प्रकरणात दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण फक्त 21 टक्के राहिले.
DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दहा प्रकरणे
गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट सुटत आहेत आणि तेच आरोपी हिंमत वाढल्यामुळे भविष्यात पुन्हा पुन्हा गुन्हे करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात तपास अधिकारी तपास करत असताना, त्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्राधिकृत करुन प्रत्येकाकडे दहा प्रकरणे दत्तक दिली आहेत. दरम्यान, नागपूर पोलिसांच्या या गुन्ह्यांच्या दत्तक योजनेतून दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण किती वाढते हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
Nagpur Crime : क्राईम कॅपिटल नागपूर 16 महिन्यात बनले 'अल्पवयीन गुन्हेगारांचे कॅपिटल'