Sharad Ponkshe On Rahul Gandhi : “सावरकर समजून घ्यायचे असतील तर”; शरद पोंक्षेंचा राहुल गांधींना खोचक सल्ला
Sharad Ponkshe On Rahul Gandhi : बिचाऱ्या राहुल गांधीला सावरकर समजलेलेच नाहीत. त्याला सावरकर समजून घ्यायचे असल्यास त्याने माझे व्याख्यान ऐकावे. अशी टीका अभिनेते शरद पोंक्षेनी राहुल गांधींवर केली.
नागपूर : सावरकरांबद्दल वारंवार बोलणारा राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणजे वेडसर आहे. त्या बिचार्याला सावरकरांबद्दल काहीच माहित नाही. राहुल गांधी सावरकरांबद्दल अभ्यास न करता, वाचन न करता फक्त शिव्या देतो. कारण त्याला राजकीय स्वार्थ साधायचे आहे. आधी कधीही मंदिरात न दिसणारे राहुल गांधी राजकीय स्वार्थासाठी कोटच्या वर जानवं घालत असल्याचे आपण पाहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या बिचाऱ्या राहुल गांधीला सावरकर समजलेलेच नाहीत. त्याला सावरकर समजून घ्यायचे असल्यास त्याने माझे व्याख्यान ऐकावे. असा खोचक सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी राहुल गांधींना दिला. नागपुरात नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने आले असता ते एबीपी माझाशी बोलत होते.
सावरकरांबद्दल बोलायला उंची लागते- शरद पोंक्षे
आपल्या देशात महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक या महापुरुषांची व्यक्तिपूजा केली गेली. मात्र, ही सर्व महापुरूष मंडळी अखेर माणसंच होती हे विसरून आपण त्यांना देव बनवून त्यांची पूजा करू लागलो. त्यामुळे या माणसांच्या काही बाबी लोकांना रुचणार नाही, पटणार नाही, हे आपण स्वीकार करायला तयारच नसतो. कोणी या महापुरुषांची दुसरी बाजू, म्हणजेच नकारात्मक बाजू समोर आणण्याचे प्रयत्न केले, तर त्याला विरोध होतो. हिंसा घडवली जाते. असे मत ज्येष्ठ रंगकर्मी आणि "मी नाथूराम गोडसे बोलतोय" या नाटकाचे अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. सावरकरांबाबत जेवढे बेताल व वादग्रस्त वक्तव्य कराल तेवढे सावरकर वाचले जातील. असेही शरद पोंक्षे म्हणाले.
वयाची मर्यादा लक्षात घेता 'नथुराम'च्या प्रवासाला रामराम
शरद पोंक्षे आणि 'नथुराम गोडसे हे अजोड समीकरण आहे. मात्र वयाची मर्यादा लक्षात घेता या भूमिकेला अखेरचा रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले. नथुराम वयाच्या 39 व्या वर्षी फासावर लटकला, आता माझे वय 58 आहे. वय, काळ, वेळ लक्षात घेता कुठेतरी थांबायलाही हवे. आज जवळजवळ 1200 प्रयोग झालेत.1998 मध्ये वयाच्या 32-33व्या वर्षी 'नथुराम' चा प्रवास सुरू झाला. अभिनेते म्हणून झेललेली घणाघाती टीका, व्यक्ती म्हणून शरीरावर झालेला कॅन्सरचा आघात या सर्व महाकठीण अडचणींतून मार्ग काढत मी इथवर आलो. परंतु कॅन्सरच्या छायेत नथुरामचा समारोप करायचा नव्हता. म्हणून तब्येतीने पुन्हा साथ देताच, महाराष्ट्र पिंजून काढत या प्रयोगाची समाप्ती करायचे होते. मधल्या काही काळात बंद झालेले नाटक पुन्हा उभे केले. परंतु वयाची मर्यादा लक्षात घेता, आता कुठेतरी थांबले पाहिजे. असे शरद पोंक्षे म्हणाले.
गणराज्यदिनी मुंबईत होणार शेवटचा प्रयोग
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकावर प्रेम करणारे अनेक सुजाण रसिक भेटलेत. 'नथुराम गोडसे' या नाटकाचा सध्या विदर्भदौरा सुरू आहे. नागपुरात शेवटचा प्रयोग 23,24,25 डिसेंबरला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे होणार आहे. तर शुक्रवार, 22 डिसेंबरला चंद्रपूर येथे आणि 26 डिसेंबरला अमरावती येथे प्रयोग आहे. या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबई येथे 26 जानेवारीला होईल व त्यानंतर हे नाटक कायमचे थांबणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :